मुंबईत महापौर भाजपाचाच : जे. पी. नड्डा | पुढारी

मुंबईत महापौर भाजपाचाच : जे. पी. नड्डा

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात मुंबईसह महाराष्ट्राचा विकास रखडला होता. प्रकल्पांची कामे बंद पडली होती. मात्र राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर या विकासकामांना, प्रकल्पांना वेग आला आहे. आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाचाच महापौर विराजमान झालेला दिसेल, असा विश्वास भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा काँग्रेस असो हे सर्व पक्ष कौटुंबिक पक्ष आहेत. भाजपा हा एकमेव असा पक्ष आहे ज्याचे वैचारिक अधिष्ठान आहे. भाजपात एक साधा कार्यकर्ता देखील देशाच्या पंतप्रधानपदावर विराजमान होऊ शकतो., अशी टीकाही नड्डा यांनी केली. जे.पी. नड्डा हे दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौ-यावर आले आहेत. बुधवारी ते पक्षाच्या विविध कार्यक्रमात सहभागी झाले. कांदिवली येथे पन्नाप्रमुखांना मार्गदर्शन करताना त्यांनी मुंबई महापालिका जिंकण्याचा मनोदय व्यक्त केला.

भाजपाच हा पक्ष वाढेल असे जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा विरोधी पक्षांना झोंबते. विरोधी पक्षात कोणाकडे नेता आहे आहे, पण निती नाही. निती आहे तर नियत नाही. नियत आहे पण नेता नाही. काहींकडे तर कार्यकर्तेच नाहीत. भाजपा हा एकमेव पक्ष आहे की ज्याच्याकडे नेता, नीती, नियत, कार्यक्रम, कार्यकर्ता आणि ताकदही आहे. भाजपा हा एकमेव पक्ष जो सर्व ठिकाणी, सर्व समाजात आहे. म्हणून आपण भाग्यवान आहोत. इतर पक्ष आता वैचारिकतेपासून हरवत चालले आहेत. आमच्या पिढया बदलल्या पण विचार आणि मुद्दे आम्ही बदलले नाहीत, असे नड्डा म्हणाले.

Back to top button