सावधान …! फळांचा राजा बनतोय विषारी! नागरिकांचे आरोग्य धोक्यात | पुढारी

सावधान ...! फळांचा राजा बनतोय विषारी! नागरिकांचे आरोग्य धोक्यात

शशिकांत भालेकर

पारनेर(अहमदनगर) : सध्या धकाधकीच्या काळात आरोग्याला खूप महत्त्व आहे. उत्तम आरोग्य ठेवण्यासाठी व्यायाम, त्याचबरोबर चांगले व पौष्टिक खाणेपिणे महत्त्वाचे आहे; मात्र सध्या सर्वत्र भेसळ व केमिकलचा मारा मोठ्या प्रमाणात केला जातो. यात पालेभाज्या, फळे, दूध, तेल, चिकन आदी सर्वच गोष्टींमध्ये भेसळ व केमिकलचे पदार्थ वाढल्याने ते आरोग्यासाठी घातक असताना नागरिक त्याकडे कानाडोळा करताना दिसत आहेत. आंब्याचा सिझन असल्याने आंबे घेण्याकडे ग्राहकांचा कल आहे; मात्र हेच आंबे खाण्यास योग्य आहेत का याची पडताळणी ग्राहक करताना दिसून येत नाहीत. आंबे पिकविताना सर्रास कार्पेटचा वापर होतो, हे होताना त्याचा अती वापर मानवी शरीरासाठी घातक आहे.

या वापराबाबत अन्न आणि औषध प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, बाजारात अशा लाखोंची अंबा विक्री होताना अन्न आणि औषध प्रशासनाने डोळ्यावर कोणती पट्टी बांधली, असा सवाल उपस्थित होतो. आंबे पिकविण्यासाठी मानवी आरोग्यास हानीकारक असलेल्या कॅल्शियम कार्बाइडचा (कारपेट) वापर सर्रासपणे सुरू असल्याचे, तसेच हे कारपेट बाजारात सहजपणे उपलब्ध होत असल्याच्या तक्रारी आहेत.
त्यामुळे रसायनाच्या वापरामुळे आंबा घातक ठरत असून, कृत्रिमरित्या आंबा पिकविला जात असल्याने त्यातील रसाचेही प्रमाण कमी होत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.

एरव्ही आंब्याचा हंगाम सुरू झाल्यानंतर त्यावेळी कार्बाईडचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो. आता, हा हंगाम संपत आला तरी कॅल्शियम कार्बाइडचा वापर सुरूच आहे. कॅल्शियम कार्बाइडचा उपयोग वेल्डिंग व इतर कामांसाठी होत असल्याने त्याच्या विक्रीवर बंदी नाही. त्यामुळे ते सहज उपलब्ध होते. मात्र, आंब्याच्या मोसमात उगीच नसती झंझट नको म्हणून विक्रेत्यांकडून कॅल्शियम कार्बाइड विक्रीबाबत खबरदारी घेतली जाते. अनोळखी व्यक्तीने चौकशी केल्यास कॅल्शियम कार्बाइड नसल्याचे सांगितले जाते.

मात्र, नेहमीचे फळ व्यावसायिक आल्यास मात्र पद्धतशीरपणे त्यांना कॅल्शियम कार्बाइड उपलब्ध करून दिले जात आहे. कॅल्शियम कार्बाइड स्फटीक स्वरूपात असते. ते पुडीत बांधून आंब्यांमध्ये ठेवले व हवा लागू दिली नाही तर त्यातून प्रचंड उष्णता निर्माण होऊन त्याचे राखेत रुपांतर होते. निर्माण झालेल्या उष्णतेतून आंबे पिकतात.

अनेकदा ट्रकमधून माल येताना त्यात विशिष्ट झाडाच्या पानात कॅल्शियम कार्बाइडच्या पुड्या बांधून टाकल्या जातात. त्यामुळे माल पोहोचेपर्यंत निम्मा पिकून जातो. जो माल पिकणे बाकी असतो, त्यावर स्थानिक व्यापारी पुन्हा कॅल्शियम कार्बाइडचा वापर करून पिकविण्याची प्रक्रिया करतात. आंबे पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर करू नये, सूचना असताना कॅल्शियम कार्बाइडचा वापर होत आहे.

असे वापरले जाते कार्बाइड

आंबे पिकण्यापूर्वीच झाडावरून उतरविले जातात.पिकल्यावर आंबा मार्केटमध्ये आणायचा ठरविला तर तो सडण्याची भीती असते. त्यामुळे हा कच्चा, अर्धवट पिकलेला आंबा व्यापारी विकत घेतात. बाजारात पाकिटात मिळत असलेली पावडर दोन-तीन चमचे प्रमाणे घेऊन कागदाच्या पुड्या करून आंब्याच्या ढिगात वेगवेगळ्या कोपर्‍यात दोन-दोन फुटांच्या अंतरावर ठेवून दिल्या जातात. या पावडरच्या उष्णतेमुळे परिणाम होऊन आंबे लवकर पिकतात.

‘पालकांनी फळांविषयी जागृत राहावे’

रासायानिक पदार्थांचा वापर करून विक्री केलेली फळे शरीराला घातक आहेत. त्याचा परिणाम पोटाच्या आतड्यावर आणि किडनीवर होतो. मुळात फळांमध्ये जी जीवनसत्त्वे असतात ती रासायनिक पदार्थामुळे नष्ट होतात. त्यामुळे अशा फळांमधून जीवनसत्त्वे काहीच मिळत नाहीत. उलट शरीरावर त्याचा परिणाम होतो. विशेषत: लहान मुलांच्या किडनी आणि आतड्यावर त्याचा जास्त परिणाम होतो. हाडे ठिसूळ होत असल्याने पालकांनी फळांविषयी जागृत राहावे, असा सल्ला डॉ. आप्पासाहेब नरवडे यांनी दिला.

Back to top button