विदर्भात सूर्य आग ओकू लागला, बहुतांश जिल्हे ४२ अंशापार | पुढारी

विदर्भात सूर्य आग ओकू लागला, बहुतांश जिल्हे ४२ अंशापार

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : राज्यात ढगाळ वातावरण, अवकाळी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर तापमानाचा पारा वाढला आहे.  शनिवारी अकोल्यात या मोसमातील सर्वाधिक तापमान ४५.६ अ. से. नोंदविण्यात आले. गेल्या तीन दिवसात विदर्भात सूर्य आग ओकू लागल्याचे भासत आहे. चंद्रपूरला मागे सोडत अकोला, अमरावती नवनवे तापमानाचे उच्चांक करीत आहे. आज विदर्भातील इतर जिल्ह्यांच्या तापमानाचा विचार करता अकोला नंतर अमरावती (४४.६), वर्धा (४४.१), यवतमाळ (४३.०), नागपूर (४२.७), चंद्रपूर (४२.४), गोंदिया, (४१.६), गडचिरोली (४१.६), ब्रम्हपुरी (४१.४), बुलडाणा (४१.२) याप्रमाणे तापमानाची नोंद झाली. नागपूरचे तापमान झपाट्याने वाढत आहे. यापूर्वी १९ एप्रिलला पारा सर्वाधिक ४२ अंशावर गेला होता.

एकंदरीत सध्या विदर्भात कडक उन्हाच्या झळा बसत असून दुपारी रस्ते निर्मनुष्य होत आहेत. घशाला थंडावा देणाऱ्या गारेगार रसवंती, आईस्क्रीम, लस्सीच्या दुकानात रात्री उशिरापर्यंत गर्दी दिसत आहे. मार्चच्या मध्यापासून एप्रिल व मे महिण्याचे पहिल्या आठवड्यापर्यंत अवकाळी पावसाने राज्यात थैमान घातले होते. यामुळे पिकांचे व फुल, भाजीपाला बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कडक उन्हाळ्यापासून काही दिवस नागरिकांची सुटका झाली. कुलर,एसी व्यावसायिकांची चिंता वाढली होती. मात्र सध्या राज्यात काही जिल्हे वगळता पुन्हा सूर्य आग ओकू लागल्याने महाराष्ट्र तापला आहे.

राज्यात काही जिल्हे वगळता सर्वच जिल्ह्याचे तापमान चाळीशीपार गेले ओह. अलीकडेच जळगावमध्ये राज्यात सर्वात जास्त ४४.६ तापमानाची नोंद करण्यात आली. त्यापाठोपाठ आता पूर्वविदर्भातील अकोल्याने नेहमी हॉट असलेल्या चंद्रपूरला देखील मागे टाकले आहे. राज्यातील तापमानात अचानक वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांना उष्मघाताच्या त्रासाला समोरे जावे लागण्याची शक्यता आहे. विपुल वनसंपदा असलेला गडचिरोली जिल्हा नेहमीच थंड राहायचा परंतु आता गडचिरोलीच्या तापमानातही सतत वाढ होत आहे.

चार दिवस उष्णतेची लाट

दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील चार दिवस उष्णतेची लाट कायम असणार आहे. दिवसागणिक उन्हाची तीव्रता वाढणार असून कडक उन्हाच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागणार आहेत. विदर्भाला या तापमानाची सवय असली तरीही मुंबई, पुणे या शहरांमध्ये अलिकडच्या कालावधीत तापमानात वाढ होऊ लागली आहे. मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये उन्हाचा तडाखा वाढण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. यासोबतच राज्यातील आरोग्य यंत्रणांनी देखील नागरिकांना उष्माघात टाळण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचंलत का?

Back to top button