Karnataka Election Results 2023 | कर्नाटकात काँग्रेसकडून बहुमताचा आकडा पार?, सुरुवातीच्या कलानुसार १२३ जागांवर आघाडीवर | पुढारी

Karnataka Election Results 2023 | कर्नाटकात काँग्रेसकडून बहुमताचा आकडा पार?, सुरुवातीच्या कलानुसार १२३ जागांवर आघाडीवर

पुढारी ऑनलाईन : कर्नाटकातील २२४ जागांचे निकाल आज जाहीर होत आहेत. सुरुवातीच्या कलानुसार काँग्रेसने (Congress) १२३ अधिक जागांवर आघाडीवर घेतली आहे. तर भाजप (BJP) ७७ जागांवर आघाडीवर आहे. तर जेडीएसने (JD(S) २२ जागांवर आघाडी घेतली आहे. सुरुवातीच्या कलानुसार, काँग्रेस १२० हून अधिक जागांवर आघाडीवर असून राज्यातील बहुमताचा आकडा ११३ आहे. (Karnataka Election Results 2023)

बेळगाव दक्षिणमध्ये दुसऱ्या फेरीतील मतमोजणी सुरू झाली असून भाजपचे आमदार अभय पाटील साडेतीन हजार मतांनी पुढे आहेत. गोकाकमध्ये भाजपचे रमेश जारकीहोळी पिछाडीवर आहेत. चिकोडी सदलगा मतदारसंघात गणेश हुक्केरी आघाडीवर आहेत. बेळगाव ग्रामीणमध्ये काँग्रेसच्या लक्ष्मी हेब्बाळकार १४०० मतांनी पुढे आहेत. यमकनमर्डीत आमदार सतीश जरकिहोळी अडीच हजार मताने आघाडीवर आहेत.

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार कनकापुरा विधानसभा मतदारसंघात आघाडीवर आहेत. तर भाजपचे आर अशोक पिछाडीवर आहेत.

नारगुंड मतदारसंघात भाजपचे उमेदवार सीसी पाटील पिछाडीवर आहेत. जेडीएसचे एचडी कुमारस्वामी चन्नापटनामधून आघाडीवर आहेत. पोस्टल मतांमध्ये माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आघाडीवर आहेत. बिलगी मतदारसंघात भाजपचे उमेदवार मुरुगेश निरानी पिछाडीवर पडले आहेत. माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचा मुलगा बी वाय विजयेंद्र शिकारीपुरामध्ये आघाडीवर आहे.

कर्नाटकची सत्ता कुणाला मिळणार, हे शनिवारी (दि. १३) मतमोजणीतून स्पष्ट होत आहे. भाजप सत्ता राखणार की काँग्रेस भाजपकडून सत्ता हस्तगत करणार, याबाबत कमालीची उत्सुकता आहे. मात्र, कुठल्याच पक्षाला बहुमत न मिळाल्यास निधर्मी जनता दल किंगमेकर ठरू शकतो. त्यामुळे भाजप किंवा काँग्रेसला सोबतीला घेऊन निजद युतीची ‘मोळी’ बांधेल, अशी शक्यता आहे. डोक्यावर गवताची मोळी घेतलेली महिला हेच निजदचे पक्षचिन्हही आहे! (Karnataka Election Results)

राज्यभरात ३४ ठिकाणी मतमोजणी होणार आहे. बेळगाव जिल्ह्यातील सर्व १८ मतदारसंघांची मतमोजणी बेळगाव शहरातील राणी पार्वतीदेवी महाविद्यालयात सुरु आहे. (Karnataka Election Results)

संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणारी कर्नाटक विधानसभा निवडणूक आगामी वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम मानली जाते. इथे काँग्रेस जिंकली, तर केंद्रातही सत्तापालटाची आशा काँग्रेससह तिसर्‍या आघाडीला राहील. मात्र, भाजप जिंकला, तर पुढच्या वर्षीची लोकसभा निवडणूक तो पक्ष आणखी जोमाने लढवेल. कर्नाटकात सध्या भाजपची सत्ता आहे.

निवडणूकपूर्व चाचण्या आणि एक्झिट पोलमध्ये काँग्रेस हा १०० ते ११० जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरेल, असे भाकीत वर्तवण्यात आले आहे; तर काही एक्झिट पोलनी काँग्रेसला स्पष्ट बहुमत देऊ केले आहे. कुणाचे भाकीत खरे, हे आज दुपारपर्यंत स्पष्ट होईल. राज्यातील २२४ विधानसभा मतदारसंघांत २,६१५ उमेदवार रिंगणात आहेत. बेळगाव जिल्ह्यातील १८ मतदारसंघांत १८७ उमेदवार लढत आहेत. (Karnataka Election Results 2023)

हे ही वाचा :

 

Back to top button