नगर : सरकारला अधिकचे काम करण्याची शक्ती ; मंत्री विखे पाटलांची न्यायालयाच्या निकालानंतर प्रतिक्रिया | पुढारी

नगर : सरकारला अधिकचे काम करण्याची शक्ती ; मंत्री विखे पाटलांची न्यायालयाच्या निकालानंतर प्रतिक्रिया

शिर्डी (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : जनतेच्या मनातील सरकारवर ’सुप्रिम’ शिक्कामोर्तब आजच्या निर्णयामुळे झाले असून, अधिकचे काम करण्याची शक्ती सरकारला मिळाली असल्याची प्रतिक्रिया महसूल पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील यांनी या निर्णयाचे ‘बाजीगर’ ठरलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करून, आजचा निकाल म्हणजे दररोज पोपटपंची करणार्‍या महाविकास आघाडीच्या नेत्यांना आत्मपरीक्षण करयाला लावणारा असल्याचे स्पष्ट केले.

सरकार बेकायदेशीर असल्याचा आरोप रोज करून जनतेची दिशाभूल करणारे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे चेहरे आज उघडे पडले असल्याचे सांगून राज्य सरकार स्थिर होतेच, परंतू आजच्या निर्णयामुळे अधिकचे काम करून जनतेच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याचा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला. समान कार्यक्रम घेवून तयार झालेल्या आघाडीला आता सामान गुंडाळण्याची वेळ आली असल्याचा टोला लगावून मंत्री विखे म्हणाले की,सध्या महाविकास आघाडीमध्ये भविष्यकार तयार झाले आहेत, त्यांचे सर्व अंदाज आजच्या निर्णयामुळे खोटे ठरले असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नैतिकतेच्या गप्पा करू नयेत. कारण राज्यातील जनतेन भाजप शिवसेना युतीला दिलेला कौल अमान्य करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेलात.सतेसाठी विचार आणि हिंदुत्व सोडले,स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करणार्‍या काँग्रेस नेत्यांच्या मांडीला मांडी लावून आजही बसता. मुख्यमंत्री असताना देवभक्ती आणि देशभक्ती दाखवली म्हणून अनेकांना तुरूंगात टाकले, तेव्हा तुमची नैतिकता कुठे गेली होती? असा सवालही मंत्री विखे पाटील यांनी उपस्थित केला.

Back to top button