दागिने लुटून वृध्देचा खून करणारा जेरबंद; मंचर पोलिसांची कामगिरी | पुढारी

दागिने लुटून वृध्देचा खून करणारा जेरबंद; मंचर पोलिसांची कामगिरी

मंचर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : मंचर (ता. आंबेगाव) येथे अंजनाबाई प्रभाकर बाणखेले (वय 78) या वृद्ध महिलेच्या अंगावरील 1 लाख 30 हजार रुपये किमतीचे दागिने लुटून तिचे तोंड मातीत दाबून तिचा खून करून फरार झालेल्या आरोपीस मंचर पोलिसांनी अटक केली आहे. गजानन बुद्धजन बांगर (वय 31, रा. काकनवाडा खुर्द, ता. संग्रामपूर, जि. बुलढाणा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजनाबाई यांच्या नातेवाइकांच्या मदतीने पोलिसांनी घरामागे शोध घेतला असता, घराच्या मागे अश्विन बाणखेले यांचे हत्ती गवताचे शेतात अंजनाबाई यांचा मृतदेह मिळून आला होता. त्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समजून आल्यावर मंचर पोलिस ठाणे येथे अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर गोपनीय बातमीदारांकडून मंचर पोलिसांना माहिती मिळाली की, अंजनाबाई बेपत्ता होण्याअगोदर गजानन बांगर नावाची व्यक्ती ही मृत महिला अंजनाबाई बाणखेले यांच्याकडे मोलमजुरी करत होती. गजानन बांगर हा अंजनाबाईचा मृत्यू झाल्यापासून फरार होता, त्यामुळे त्यानेच महिलेचा खून केला असून, तो गुजरामध्ये सुरत येथे गेला असल्याचे समजले.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्यासाठी एक पथक सुरत येथे रवाना करत गजानन बुद्धजन बांगर यास ताब्यात घेऊन खुनाच्या गुन्ह्यात अटक केली. त्याला प्रथमवर्ग न्यायालय, घोडेगाव येथे हजर केले असता, न्यायालयाने त्यास बुधवार (दि. 17) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या घटनेचा तपास मंचरचे पोलिस निरीक्षक सतीश होडगर हे करीत आहेत.

Back to top button