पिंपरी : एकेरी वाहतूक ठरतोय ‘कोंडीचा मार्ग’ | पुढारी

पिंपरी : एकेरी वाहतूक ठरतोय ‘कोंडीचा मार्ग’

हिंजवडी : विविध कारणांमुळे आयटी नगरी हिंजवडी परिसरात वाहतूक कोंडी काही न काही मार्गाने होत असते. त्यामुळे पोलिस आणि वाहतूक विभाग कायमच तणावाखाली असतो. यास आता नव्याने तयार करण्यात आलेल्या एकेरी वाहतूक ही कोंडीचा मार्ग ठरत आहे.
प्रायोगिक तत्त्वावर ही एकेरी वाहतूक वाहतूक विभागाच्या वतीने करण्यात आली असून, हिंजवडी-वाकड वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस अतिशय गंभीर आणि व्यापक होत आहे. यापूर्वी केवळ हिंजवडी-भुजबळवस्ती रस्त्याचा प्रश्न आता मात्र इतर रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे गंभीर होत आहे.

गुरुवारी (दि.4 मे) रोजी मुसळधार पावसानंतर मोठ्या प्रमाणात वाकड येथे वाहतूककोंडी झाली. परिणामी आयटीयन्स आणि ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागला यातच वाकड पोलिसांनी केलेल्या एकेरी वाहतुकीची अनेक वाहनचालकांना पुरेशी कल्पना नसल्यामुळे अधिकच गंभीर रित्या हा प्रश्न अधोरेखित झाला. पावसानंतर होणारी वाहतूककोंडी हा गंभीर प्रश्न सध्या निर्माण होत आहे. यातच भूमकर वस्ती येथे भूमकर वस्तीकडून लक्ष्मीचौककडे येणार्‍या रस्त्याला पंक्चर करावे लागते यामुळे दोन लेनची वाहतूक थांबवावी लागते. परिणामी मागील वाहने वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडतात.

यासह भूमकरवस्ती येथील द्रुतगती मार्गाचा पूल कमी उंचीचा आणि लहान असल्याने देखील एकावेळी कमी संख्येने वाहने पुलाखालून जात असल्यानेदेखील वाहतुककोंडी होत असल्याचे निदर्शनास आल्याने काही ठिकाणी एकेरी वाहतूक करण्याचा घाट प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आला. मात्र, याचा पुरता बोजवारा उडाला असल्याचे या घटनेमुळे निसर्शनास येत आहे. यातच बेशिस्तपणे वाहने चालवणार्‍या चालकांची संख्या देखील मोठी असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे.

प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आलेली एकेरी वाहतूक
भूमकर चौकातून विनोदे वस्तीकडे जाणारा रस्ता बंद करून वाहतूक कस्तुरी चौकमार्गे वळवली आहे. तर काळाखडक येथील पंक्चर बंद करून, मंगलनगर, कस्पटे वस्ती आणि राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी पुढे सुमारे अर्धा किलोमीटर लांब यू-टर्न घेण्यासाठी पंक्चर ठेवला आहे. भूमकर चौकातील एकेरी वाहतुकीमुळे कस्तुरी चौकमार्गे विनोदे वस्तीकडे जोडणाच्या रस्त्यावर वाहतूक संथ होत असल्याने वाहतूक कोंडीत अधिक भर पडली आहे.

वाकड ते हिंजवडी हा वाहतुकीच्या दृष्टीने मोठा प्रश्न वाहतूक पोलिसांसमोर आहे. त्यावर वेळोवेळी मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येतो. त्यासाठीच हा एकेरी वाहतुकीचा प्रयोग राबवण्यात येत आहे. मागील दोन दिवस हा प्रयोग यशस्वी ठरला. मात्र, गुरुवारी सायंकाळी वाकड परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने भूमकर पुलाखाली पाणी साचले होते. तसेच सायंकाळच्या वेळी असणारी वाहतूक वाढली असल्याने वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात झाली.
                   – सुनील पिंजण, पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग, वाकड

 

Back to top button