नगरमधील शेवगावात शासकीय योजनांची भरणार जत्रा | पुढारी

नगरमधील शेवगावात शासकीय योजनांची भरणार जत्रा

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा :  राज्य सरकारच्या योजनेचा शेतकर्‍यांना लाभ देण्यासाठी सरकारने ‘जत्रा शासकीय योजनांची-सर्व सामान्यांच्या विकासाची’ हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. तो टप्याटप्याने राबविण्यात येणार आहे. याबाबत प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी नुकतीच तालुक्यातील अधिकार्‍यांची बैठक घेऊन त्यांना सूचना केल्या आहेत. तहसील कार्यालयात यासाठी जनकल्याण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नागरिकांना सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी विविध प्रक्रियेतून जावे लागते. तसेच कागदपत्रे जमा करण्यास वेगवेगळ्या ठिकाणी असणार्‍या कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे या त्रासाने तो लाभ घेण्याचा नाद सोडून देतो.

तसेच, अनेक गरजू व्यक्तींना योजनेची माहिती नसते. त्यामुळे शासकीय योजना लोकभिमुख करून त्याची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी ‘जत्रा शासकीय योजनांची-सर्व सामान्यांच्या विकासाची’ हे अभियान राबविण्यास सरकारने सुरुवात केली आहे. यात संबंधित कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी एका छताखाली एकत्र येऊन विविध योजनांचे लाभ देणार आहेत.

हा उपक्रम 15 जूनपर्यंत टप्याटप्याने राबविण्यात येणार असून, या संबंधी शेवगाव तहसील कार्यालयात प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी बैठक घेतली. बैठकीत सर्व विभागांच्या अधिकार्‍यांना योजना राबविण्याच्या सूचना केल्या आहेत. बैठकीस तहसीलदार छगन वाघ, नायब तहसीलदार राहुल गुरव, राजू दिवाण, सहायक गटविकास अधिकारी दीप्ती गट, बांधकाम विभागाचे प्रल्हाद पाठक, तसेच आर. एम. शिदोरे, आर. व्ही. कदम, एस. एम. लोहारे आदी उपस्थित होते. लवकरच शेवगाव येथे एकाच छताखाली सर्व विभागांचे स्टॉल लावण्यात येणार असून, तालुक्यात वीस हजार लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

यामध्ये बळीराजाच्या उन्नतीसाठी लाभार्थ्यांना कमी कागदपत्रात व निर्धारित शुल्कात जलद लाभ देण्यात येणार आहे. यात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, ग्रामपंचायत विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग, समाज कल्यान, नगरविकास विभाग, मनरेगा, सहकार, महामंडळ अशा तालुक्यात 29 विभागांच्या योजना आहेत. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त 36 विभागामार्फत 75 सरकारी योजनेची माहिती आणि प्रत्येक जिल्ह्यात 75 हजार लाभार्थ्यांना लाभ देण्याचा सरकारचा मानस आहे.

जनकल्याण कक्ष स्थापन
येथील तहसील कार्यालयात जनकल्याण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. येथे तहसीलदार छगन वाघ, नायब तहसीलदार राजू दिवाण, महसूल सहायक संतोष गर्जे यांची नियुक्ती करण्यात आली असून, ते लाभार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

Back to top button