पुणे : आता लोककलावंतांचेही महाराष्ट्रभर दौरे | पुढारी

पुणे : आता लोककलावंतांचेही महाराष्ट्रभर दौरे

पुणे; पुढारी वृत्तसेवा : लोककलांच्या कार्यक्रमांना दोन ते अडीच वर्षांत फारसा प्रतिसाद नव्हता. पण, आता लोककलांच्या कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत असून, लोककलावंत महाराष्ट्रभर दौरे करून कलेचे सादरीकरण करीत आहेत. कोल्हापूर, सातारा, सांगली, नाशिक, मुंबई, पुणे, नागपूर आदी ठिकाणी जाऊन लोककलावंत कला सादर करीत असून, त्यांच्या कार्यक्रमांना चांगली बुकिंगही मिळत आहे, चांगला आर्थिक मोबदलाही दिला जात आहे. याशिवाय काही कलावंत ठिकठिकाणी लोककला प्रशिक्षण वर्ग घेत असून, त्यातून त्यांचीही कमाई होत आहे. ’महाराष्ट्राची लोकधारा’पासून ते कीर्तनाच्या कार्यक्रमांपर्यंतचे वैविध्यपूर्ण कार्यक्रम महाराष्ट्रात अगदी ग्रामीण भागात कलावंत सादर करीत आहेत.

शाहिरी असो वा भारूड… कीर्तन असो वा वासुदेव… अशा लोककलांनी महाराष्ट्राच्या मातीला समृद्ध केले. काही काळ लोककलावंतांच्या लोककलांच्या कार्यक्रमांना फारसा प्रतिसाद नव्हता. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. पण, आता लोककलांच्या कार्यक्रमांना कोकण विभाग असो वा जळगाव… विविध जिल्ह्यांमध्ये प्रतिसाद मिळत असून, लोककलावंतही ठिकठिकाणचे दौरे करीत आहेत. विशेषत: लोककलावंत आता लोककलांचे प्रशिक्षण वर्गही घेत आहेत. शाहिरी, गोंधळ, जागरण, वासुदेव, पोतराज यासह
महाराष्ट्राची लोकधारा आदी कार्यक्रमांचे सादरीकरण ते करीत आहेत.

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंत मावळे म्हणाले की, लोककलावंत आता ठिकठिकाणी जाऊन कलांचे सादरीकरण करीत आहेत. आता महाराष्ट्रभर दौरेही होत आहेत. विशेष करून ग्रामीण भागातील यात्रा-जत्रांमध्ये कार्यक्रम सादर होत आहेत. महाराष्ट्राची लोकधारा, लावणी, शाहिरी, भारूड… अशा कार्यक्रमांना प्रतिसाद आहे. एका कार्यक्रमासाठी 4 ते 15 हजार रुपयांपर्यंतचा आर्थिक मोबदला मिळत आहे. आता लोककलावंतांना कार्यक्रम मिळत असल्याने तेही उत्साहाने कार्यक्रम सादर करीत आहेत.

महिन्याला सात ते आठ कार्यक्रम

आताच्या घडीला एक लोककलावंत महिन्याला सात ते आठ कार्यक्रम सादर करीत आहे. पारंपरिक वेशभूषेत लोककलांचे
सादरीकरण होत असून, यात्रा-जत्रांमध्ये लोककलांच्या कार्यक्रमांना सर्वाधिक मागणी आहे. त्याशिवाय आता काही कलावंत कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपणही सोशल मीडियावर करीत आहेत. शाहिरीपासून ते पोतराजपर्यंतच्या कला सादर केल्या जात असून, कलावंतांची पुढील पिढीही कार्यक्रमांसाठी सहकार्य करीत आहे.

Back to top button