अनधिकृत बांधकाम करणार्‍या नगरमधील व्यापार्‍यांना नोटिसा | पुढारी

अनधिकृत बांधकाम करणार्‍या नगरमधील व्यापार्‍यांना नोटिसा

नगर; पुढारी वृत्तसेवा : शहरात व्यापार्‍यांवर हल्ला होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. गत आठवड्यात झालेल्या घटनेनंतर बाजारपेठेतील अतिक्रमणे हटविण्यात आली. त्यात मनपाने अनधिकृत बांधकामाबद्दल सुमारे 15 व्यापार्‍यांना नोटिसा पाठविल्या आहेत.
शहरातील कापड बाजार, नवीन पेठ परिसरातील काही व्यापार्‍यांनी अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण केल्याबाबत मनपाच्या प्रभाग समिती कार्यालयात तक्रारी दाखल झाल्या होत्या.

त्यात व्यापार्‍यांवर वारंवार होणार्‍या हल्ल्यामुळे बाजार पेठेतील अतिक्रमण काढून हटविण्यासाठी व्यापार्‍यांनी आंदोलन केले. त्यामुळे महापालिकेने बाजारपेठेतील हातगाडी, टपर्‍या, फ्लेक्स बोर्ड अशी अतिक्रमणे काढून टाकली. व्यापार्‍यांच्या बांधकामबाबत तक्रारी दाखल झाल्याने महापालिकेच्या प्रभाग समिती कार्यालयाने शहरातील सुमारे 15 व्यापार्‍यांना अनधिकृत बांधकामांबद्दल नोटिसा काढल्या आहेत.

अनधिकृत बांधकाम व अतिक्रमणाबाबत तक्रारी आल्याने संबंधित व्यापार्‍यांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यांच्या बांधकामाचे मोजमाप करण्यात येईल. त्यानुसार योग्य कार्यवाही करण्यात येईल, असे प्रभाग अधिकारी राकेश कोतकर यांनी सांगितले.

Back to top button