रखरखत्या उन्हामुळे हिरव्या चार्‍यास वाढती मागणी | पुढारी

रखरखत्या उन्हामुळे हिरव्या चार्‍यास वाढती मागणी

बावडा : पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यात दुग्ध व्यवसायाला पुन्हा भरभराटीचे दिवस आले आहे. परिणामी, तालुक्यात बहुतांशी शेतकर्‍यांनी गोठ्यातील जनावरांच्या संख्येत मोठी वाढ केल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर हिरव्या चार्‍याला वाढती मागणी असल्याने उच्चांकी बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे चालू उन्हाळी हंगामात अनेक शेतकर्‍यांनी मकवान, कडवळ आदी चारा पिकांची लागवड केली आहे. सध्या काढणीस आलेल्या मकवानाचा दर प्रतिक्विंटलला 1 हजार 500 ते 1 हजार 600 रुपयांच्या आसपास आहे.

दूध धंदा मोठ्या प्रमाणावर वाढल्याने हिरव्या मकवानास सध्या दूध उत्पादकांकडून मोठी मागणी आहे. उन्हाळा आणखी दोन महिने असून त्यानंतरदेखील हिरव्या चार्‍याची मागणी कायम राहणार आहे हे पाहता, अनेक शेतकर्‍यांनी आर्थिक उद्देश लक्षात घेऊन मकवान, कडवळ यांची लागवड केली केली आहे, अशी माहिती प्रगतिशील शेतकरी गणेश घोगरे, अंकुश घाडगे (बावडा), काशिनाथ अनपट (लाखेवाडी), रणजित खाडे (शहाजीनगर), दूधगंगा दूध संघाचे संचालक दयानंद गायकवाड (बोराटवाडी) यांनी दिली.
अनेक शेतकर्‍यांनी घरातील युवकांनी बेरोजगारीवर उपाय म्हणून गोठ्यातील जनावरांची संख्या वाढविली आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकर्‍यांनी उपलब्ध क्षेत्रावर चारा पिकाची लागवड करून आगामी काळातील किमान स्वतःचा हिरव्या चा-याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

ज्वारीचा कडबा सापडेना
एक दशकापूर्वी गाईच्या गोठ्याशेजारी ज्वारीच्या कडब्याच्या शिस्तबद्ध पद्धतीने लावलेल्या अनेक गंजी दिसून येत असत; मात्र अलीकडे वाढलेल्या ऊस क्षेत्रामुळे रबी ज्वारी पिकासाठीचे क्षेत्र अतिशय अत्यल्प राहिले आहे. त्यामुळे आता गोठ्याशेजारी ज्वारीच्या कडब्याच्या गंजी दिसत नसून, त्याची जागा वाळलेल्या मकवानाच्या गंजींनी घेतली आहे.

Back to top button