दामदुपटीचा फंडा अन् पोलिसांनाच गंडा ! | पुढारी

दामदुपटीचा फंडा अन् पोलिसांनाच गंडा !

पुणे : पुढारी वृत्तसेवा : 20 महिन्यांत दामदुप्पट पैसे देण्याच्या आमिषाने गुतंणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणार्‍या राठोड दाम्पत्याच्या जाळ्यात पोलिसही मोठ्या प्रमाणात अडकल्याचे समोर आले आहे. आर्थिक फसवणूक झाल्याच्या संदर्भात अंदाजे 20 पोलिसांनी आर्थकि गुन्हे शाखेकडे तक्रारी केल्याची माहिती आहे. मात्र, पोलिसांच्या फसवणुकीचा आकडा 60 पेक्षा अधिक असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी, चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात एपीएस वेल्थ व्हेंचर्श एलएलपी या कंपनीचे संचालक अविनाश अर्जुन राठोड, त्याची पत्नी विशाखा अविनाश राठोड (रा. आनंदबन सोसायटी, रावेत) व त्याचे साथीदार चार दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वाकड येथील एका 50 वर्षांच्या डॉक्टरांनी फिर्याद दिली आहे.

आरोपींनी शेकडो कोटींचा घोटाळा केल्याचे सांगितले जात आहे. अद्याप आर्थकि गुन्हे शाखेकडे शंभरपेक्षा अधिक याबाबत तक्रारी आल्या आहेत. हा आकडा आणखी वाढत जाण्याची शक्यता आहे. पोलिसांनी राठोड दाम्पत्याच्या कंपनीत गुंतवणूक केली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पोलिस दलातील 60 ते 65 पोलिसांची फसवणूक झाली आहे. अविनाश राठोड याने एपीएस ही शेअर मार्केट कंपनी स्थापन केली. गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखविले. सुरुवातीला त्याने काही जणांना पैसे परतही केले. त्यामुळे त्याच्यावर विश्वास

बसल्याने पुणे, मुंबई, विदर्भासह इतर शहरातील नागरिक विशेषत: शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी त्याच्या योजनेत पैसे गुंतवले. जवळपास 20 महिन्यांनंतर मार्च 2023 मध्ये या गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याची वेळ आली. लोक पैसे मागू लागले, तेव्हा त्याने प्रकृतीचे कारण सांगून 10 एप्रिल 2023 पर्यंत वाट पाहण्याची विनंती केली. दरम्यानच्या काळात संशय निर्माण होऊ नये म्हणून त्याची पत्नी विशाखा राठोड हिने कार्यालयात येणा-या गुंतवणूकदारांना बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडून वेळ मागून घेतला. 10 एप्रिलपासून गुंतवणूकदार त्यांच्याशी संपर्क करू लागले तर त्यांच्याशी संपर्क होत नसल्याचे पाहून लोकांनी सुरुवातीला चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र, तक्रारदारांची वाढती संख्या पहात प्रकरणाच्या गांभीर्यानुसार हा तपास आर्थकि गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. त्यानुसार त्यांनी चौकशी करून गुन्हा दाखल केला.

 

Back to top button