पारनेर : सत्तेसाठी सेना नेत्यांनी लाचारी पत्करली : खासदार डॉ. सुजय विखे | पुढारी

पारनेर : सत्तेसाठी सेना नेत्यांनी लाचारी पत्करली : खासदार डॉ. सुजय विखे

पारनेर; पुढारी वृत्तसेवा : सत्तेसाठी शिवसेनेच्या नेत्यांनी लाचारी पत्करली आहे. कट्टर शिवसैनिकांसाठी हा स्वाभिमानाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्यांनी तालुक्यात पंधरा वर्षे शिवसेनेचा आमदार निवडून दिला, इतर कोणाचीही दडपशाही, गुंडागर्दी, गुन्हेगारी खपवून घेतली नाही, अशा कडवट शिवसैनिकांची ही परीक्षेची वेळ आहे. आपला स्वाभिमान दुसर्‍याच्या पायावर गहाण ठेवायचा की, स्वतःच्या ताकदी भाजप व शिवसेनेबरोबर यायचं, हा निर्णय घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे, खासदार डॉ.सुजय विखे यांनी सांगितले.

पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या प्रचार दौर्‍यानिमित्त पत्रकारांशी संवाद साधताना खासदार विखे बोलत होते. ते म्हणाले, मला या तालुक्यातील शेतकर्‍यांनी, गोरगरीब जनतेने निवडून दिलेले आहे. ठेकेदारांकडून हप्ते घेण्यात आले नाहीत. थेट ग्रामपंचायतच्या सरपंचांना कामे दिली गेली. यापूर्वी ठराविक लोकांनाच कामे देऊन डोंगरचे डोंगरे गायब करण्याचे काम उत्खननामध्ये केले गेले.

बाहेरच्या अतिक्रमणे कोणाबद्दल बोलत असतील माहित नाही. मी या भागाचा खासदार आहे, राधाकृष्ण विखे पाटील जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. मग, बाहेरचा कोण? ज्या लोकांना वारंवार बाहेर जाण्याची सवय झाली आहे, त्यांना सर्वजण बाहेरचे वाटतात. त्यांच्यावर भाष्य करणार नाही, असे खासदार विखे म्हणाले.

तालुक्यात जी युती आता समोर आली आहे, ती एका दिवसात झालेली नाही. नगरपंचायत निवडणुकीपासून या गुप्त बैठका सुरू होत्या. आता फक्त ती जनतेसमोर आली आहे. त्यामुळे आता जनतेनेच ठरवावे की कोणत्या विचाराबरोबर आपल्याला रहायचे आहे.
गेल्या साडेतीन वर्षात अधिकार्‍याना दमदाटी व मारहाण, वाळू व गौण खनिज उपसा, मनमानी कारभार असे प्रकार सुरू होते. त्यामुळे ही निवडणूक बाजार समितीपुरती मर्यादित नाही तर तालुक्याचे भवितव्य ठरविणारी आहे. आम्ही दिलेले उमेदवार स्वच्छ चारित्र्याचे, गुन्हे दाखल नसलेले, अवैध धंदे न करणारे आहेत.

Back to top button