राजाराम कारखाना निवडणूक : दुपारी १२ पर्यंत सरासरी ६५ टक्के मतदान | पुढारी

राजाराम कारखाना निवडणूक : दुपारी १२ पर्यंत सरासरी ६५ टक्के मतदान

कसबा बावडा : पुढारी वृत्तसेवा : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज (दि. २३) मतदान होत आहे. दुपारी १२ पर्यंत सरासरी ६५ टक्के मतदान झाले असून सात तालुक्यातील ५८ मतदान केंद्रांवर चुरशीने मतदान सुरू आहे. सकाळपासूनच काही मतदान केंद्रांवर मतदारांनी रांगा लागल्या असून केंद्रांवर गटनेते, उमेदवार, समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे. सत्ताधारी महाडिक आघाडीचे नेते, माजी आमदार महादेवराव महाडिक आणि खासदार धनंजय महाडिक यांनी सेंट झेवियर्स मतदान केंद्रामध्ये मतदान केले. कसबा बावड्यातील केंद्र क्रमांक ४५ महागावकर विद्यालय येथे सकाळपासूनच मतदानासाठी रांग लागली होती. करवीर (कोल्हापूर शहर) आणि संस्था गटातील मतदान सेंट झेवियर हायस्कूल येथे सुरू आहे. संस्था गटात सकाळी १० वाजेपर्यंत एकूण ३५ टक्के मतदान झाले होते. सकाळी ११ पर्यंत वडणगे मतदान केंद्रावर सरासरी ६२ टक्के तर टोप मतदान केंद्रावर ५३ टक्के मतदान झाले होते. दुपारी १२ पर्यंत एकुण सरासरी ६५ टक्के मतदान झाले आहे. दुपारी १ पर्यंत सावर्डे केंद्रावर ६० टक्के तर  हातकणंगले तालुक्यातील नागाव केंद्रावर ८६ टक्के मतदान झाले आहे.

कार्यक्षेत्रात पोलिसांचा चोख बंदोबस्त

छत्रपती राजाराम साखर कारखाना निवडणुकीसाठी पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून मोठा बंदोबस्त सज्ज ठेवण्यात आला आहे. शीघ्र कृती दलांसह राज्य राखीव दलाची पथके तैनात करण्यात आली आहेत. कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व 58 मतदान केंद्रांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला आहे. पोलिस अधिकार्‍यांसह एक पोलिस, एक होमगार्ड अशी पथके तैनात करण्यात आली आहेत. कसबा बावडा, शिरोली, गडमुडशिंगी, पट्टणकोडोली, कुंभोज, नरंदे, टोप, शिये, निगवे दुमाला येथील मतदान केंद्रांवरही मोठा बंदोबस्त सज्ज आहे.

श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणूक

 

राजाराम साखर कारखाना निवडणूक

Back to top button