डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी तत्कालीन तपास अधिकारी एस. आर. सिंग यांची उलटतपासणी | पुढारी

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी तत्कालीन तपास अधिकारी एस. आर. सिंग यांची उलटतपासणी

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे कुटुंबीय तुमच्याकडून तपास नीट होत नसल्याचा आरोप करीत होते का? ते आरोप खरे होते की खोटे होते? डॉ. दाभोलकर यांच्या मृतदेहाजवळ विदेशी सिमकार्ड मिळाले होते. त्यावर तुम्ही तपास केला का? असे मुद्दे उपस्थित करीत सीबीआयचे तत्कालीन तपासी अधिकारी एस. आर. सिंग यांची बचाव पक्षाच्या वतीने मंगळवारी उलटतपासणी घेण्यात आली.

विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात ‘सनातन’ संस्थेशी संबंधित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, अ‍ॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांवर आरोपनिश्चिती करण्यात आली आहे. या प्रकरणात सीबीआयचे तत्कालीन तपासी अधिकारी एस. आर. सिंग यांची उलटतपासणी बचाव पक्षाच्या वतीने अ‍ॅड. प्रकाश साळशिंगीकर यांनी घेतली.

उलटतपासणीदरम्यान अ‍ॅड. साळशिंगीकर यांनी डॉ. दाभोलकर यांच्या कुटुंबीयांनी तुमच्यावर तपास नीट होत नसल्याचे आरोप केले होते; ते खरे होते का खोटे होते? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर, सिंग यांनी डॉ. दाभोलकर यांच्या कुटुंबीयांनी आरोप केले होते. ते आरोप खोटे होते, असे सांगितले. सनातन संस्थेचा प्रमुख असलेली व्यक्ती ही मूळ कारस्थान करणारी आहे. त्याला तुम्ही पकडत नाही, असे ते आरोप होते. त्याबद्दल आम्ही सर्व तपास केला आहे. ते सर्व आरोप खोटे सिध्द झाले. त्यामुळे त्याविरोधात अहवाल दाखल केला नसल्याचे सिंग यांनी नमूद केले.

या प्रकरणात दोन जणांची पॉलिग्राफ टेस्ट करण्यात आली होती, ती कोर्टात दिली का? त्यावर त्यांनी ती डिफेक्टिव्ह होती, तसेच केस डायरीमध्ये लावल्याने ती शोधावी लागेल. मात्र, न्यायालयात दिली नसल्याचे सांगितले. याशिवाय, डॉ. दाभोलकर यांच्या मृतदेहाजवळ विदेशी सिमकार्ड मिळाले होते, त्यावर तुम्ही तपास केला का? यावर त्यांनी सिम मिळाल्याची माहिती नसल्याचे अ‍ॅड. साळशिंगीकर यांनी सांगितले.

Back to top button