नगर: आयपीएल सट्टा; बुकीला अटक, बोल्हेगावात ‘क्राईम ब्रँचची कारवाई | पुढारी

नगर: आयपीएल सट्टा; बुकीला अटक, बोल्हेगावात ‘क्राईम ब्रँचची कारवाई

नगर, पुढारी वृत्तसेवा: आयपीएलच्या सामन्यांवर मोबाईलद्वारे सट्टा घेणार्‍या एका बुकीला स्थानिक गुन्हे शाखेने बोल्हेगावातील नवनाथनगरात सापळा लावून अटक केली. गोरख मच्छिंद्र सुद्रिक (वय 26, रा. नवनाथनगर, बोल्हेगाव) असे त्याचे नाव असून, त्याच्याकडून 55 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

शहरासह उपनगरांमध्ये आयपीएल सामन्यांवर सट्टा लावणार्‍या बुकींनी मोठे जाळे तयार केले आहे. सामन्यांवर ‘बॉल टू बॉल’ सट्टेबाजी होत असल्याचे सागितले जाते. बोल्हेगावात एक जण मोबाईलवरून आयपीएलच्या सामन्यावर सट्टा घेत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली होती. त्याआधारे हवालदार दत्तात्रय गव्हाणे, संदीप पवार, लक्ष्मण खोकले यांच्या पथकाने बोल्हेगावातील नवनाथनगरात सापळा लावला.

आरोपी सुद्रिक त्याच्या घरासमोर बसून मोबाईलवर अ‍ॅपद्वारे सट्टा लावत असल्याचे दिसून आले. पथकाने त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने, साथीदार प्रवीण गिते (रा. तुळजाभवानी मंदिरा समोर, पाईपलाईन रोड) याच्या युझर आयडीवर सट्टा घेतला जात असल्याचे पोलिसांना सांगितले. सुद्रिककडून 55 हजार रुपये किमतीचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला असून, गिते याचा शोध सुरू आहे. हवालदार संदीप कचरू पवार यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button