पुणे : हक्काच्या पाण्यापासून गावे वंचित | पुढारी

पुणे : हक्काच्या पाण्यापासून गावे वंचित

शिर्सुफळ : पुढारी वृत्तसेवा :  पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांचा ढिसाळ नियोजनाचा गाडीखेल, साबळेवाडी (ता. बारामती) येथील शेतकर्‍यांना मोठा फटका बसला. मागील आठवड्यामध्ये शिरसाई उपसा सिंचन योजनेचे आवर्तन गावात फक्त आठ दिवस चालले. त्यानंतर पाणी लगेच बंद केले गेले. त्यामुळे या भागातील शेतकर्‍यांना पिकाला पाणी देण्याची गरज असताना हक्काच्या पाण्यापासून वंचित राहावे लागले आहे. याबाबत योग्य नियोजन करून परत पाणी देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

बारामती तालुक्याच्या जिरायती पट्ट्यातील गावांच्या शेती सिंचनासाठी 25 मार्च रोजी शेतकर्‍यांच्या मागणीनुसार पाणी सोडण्यात आले. मात्र, हे आवर्तन आठ दिवसांतच बंद करण्यात आले. पाटबंधारे विभागाकडून आवर्तन सोडण्याचे नियोजन योग्य करण्यात न आल्याने गाडीखेल, साबळेवाडी येथील शेतकर्‍यांना पाणी मिळाले नाही. पाण्याअभावी या भागातील शेतीपिके जळण्याच्या मार्गावर आहेत. पिण्याच्या पाण्याचीदेखील या भागात टंचाई जाणवत आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने योग्य नियोजन करून पाणी सोडावे, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने साबळेवाडीचे माजी सरपंच सतीश गोलांडे यांनी केली आहे.

जलवाहिनी फुटल्याने आवर्तन बंद
पाटबंधारे विभागातील अधिकारी अमोल शिंदे यांच्याकडे याबाबत चौकशी केली असता शिर्सूफळ येथील जलवाहिनी फुटल्याने आवर्तन बंद केल्याचे त्यांनी सांगितले. या जलवाहिनीची दुरुस्ती केली आहे. मात्र, शिर्सूफळ तलावातील पाणीपातळी कमी झाली असून, हे पाणी स्थानिक शेतकर्‍यांसाठी असल्याने बंद केले आहे. दोन ते तीन दिवसांमध्ये तलावामध्ये पुन्हा पाणी आल्यानंतर ही योजना चालू केली जाईल, असेही शिंदे यांनी सांगितले.

Back to top button