धारावी : अमेरिकन डॉलर स्वस्तात देण्याच्या बहाण्याने गंडा घालणारी टोळी गजाआड   | पुढारी

धारावी : अमेरिकन डॉलर स्वस्तात देण्याच्या बहाण्याने गंडा घालणारी टोळी गजाआड  

धारावी : पुढारी वृत्तसेवा : अमेरिकन डॉलर स्वस्तात देण्याच्या बहाण्याने एका ६२ वर्षीय वृद्धाला लाखो रुपयाचा गंडा घालणाऱ्या चार जणांच्या सराईत टोळीला कुर्ला पोलिसांनी डोंबिवली येथून अटक केली आहे. युसुफ सैमुद्दिन शेख, मोहम्मद चांदमीया शेख, रफिक हलीम शेख, मोहिन अख्तर शेख, अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी कुर्ला पोलीस ठाण्यात त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवली शिळफाटा परिसरात राहणाऱ्या टोळीने ३ एप्रिल रोजी नवी मुंबई नेरुळ परिसरात राहणारे प्रदीप कुमार बक्षीराम कौंडल यांना अमेरिकन डॉलर स्वस्तात देण्याच्या बहाण्याने कुर्ला बस डेपोजवळ बोलावले. भामट्यांच्या भुलथापाला बळी पडलेल्या प्रदीपकुमार तात्काळ स्वतःजवळील २ लाख ७५ हजाराची रोकड घेऊन कुर्ला डेपोजवळ आले. भामट्यांनी त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्याजवळील पैसे घेतले आणि एक पिशवी त्यांच्या हातात देऊन त्यात अमेरिकन डॉलर असल्याचे सांगून पसार झाले. थोड्याच वेळात प्रदीपकुमार याने पिशवी उघडून बघितली असता पिशवीत कागदाचे बंडल पाहून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ कुर्ला पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली. गुन्हा गंभीर असल्याचे पाहून वपोनि. रवींद्र होवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश काळे व गुन्हे प्रकटीकरण पथकाने सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे तांत्रिक तपास सुरु केला. या दरम्यान मुंबई, नवी मुंबई, ठाणे हद्दीतील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता नमुद आरोपी हे ठाणे, शिळफाटा डोंबिवली परिसरात असल्याचे पोलिसांना समजले. फिर्यादी जवळील आरोपीच्या मोबाईल क्रमांकाचे सीडीआर काढून त्याचे विश्लेषण केले असता आरोपी प्रत्येक गुन्ह्यांसाठी वेगवेगळे मोबाईल क्रमांक वापरत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी सापळा रचून भोपरगाव डोंबिवली येथून चार आरोपींना अटक केली आहे. सपोनि. गणेश काळे अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button