विटा मार्केट कमिटी निवडणूक : महाविकास आघाडीच्या बैठकीकडे काँग्रेसची पाठ | पुढारी

विटा मार्केट कमिटी निवडणूक : महाविकास आघाडीच्या बैठकीकडे काँग्रेसची पाठ

विटा : पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडी म्हणून लढताना विटा मार्केट कमिटीच्या निवडणुकीत माजी मंत्री विश्वजित कदम यांनी नेतृत्व करावे. पण काँग्रेसने जुन्या मैत्रीला जागून काही वेगळी पाऊले उचलणे हिताचे होणार नाही. त्याचे परिणाम राज्य पातळीवर भोगावे लागतील, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभूते आणि राष्ट्रवादीचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष अॅड. बाबासाहेब मुळीक यांनी दिला आहे.

विटा मार्केट कमिटी ही खानापूर आणि कडेगाव या दोन तालुक्यांची मिळून आहे. त्यामुळे खानापूर बरोबरच कडेगाव तालुक्यातील मतदारांनाही यामध्ये संधी मिळते. आजपर्यंत आमदार बाबर गट हा कडेगावच्या कदम गटाबरोबर आणि माजी आमदार पृथ्वीराज देशमुख गटाबरोबर सामंजस्याने गेली अनेक वर्ष सत्तेत आहे. मात्र यावेळी परिस्थिती वेगळी आहे. निवडणूक येत्या २८ एप्रिल रोजी होत असून २० एप्रिल पर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची बैठक विट्यात पार पडली. यात काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनाही आमंत्रित केले होते. मात्र काँग्रेसचा एकही पदाधिकारी बैठकीकडे फिरकला नाही. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभूते आणि राष्ट्रवादीचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. बाबासाहेब मुळीक यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली. यावेळी राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्राध्यक्ष सुशांत देवकर, तालुकाध्यक्ष किसन जानकर, उपाध्यक्ष सचिन शिंदे, अॅड. संदीप मुळीक, धनपाल माने, शिवसेना तालुका प्रमुख राज लोखंडे, दादासो भगत, संतोष जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी अॅड. मुळीक म्हणाले, खानापूर तालुका कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लागली आहे. या निवडणूकीत आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढण्याची भूमिका घेतली आहे. आमचे नेते जयंत पाटील आणि काँग्रेस नेते विश्वजित कदम यांच्यात चर्चा झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांशीही आमचे बोलणे झाले आहे. जिल्हा पातळीवर शांताराम कदम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंह कदम यांच्याशी प्राथमिक बोलणी झाली आहे. उद्या जिल्ह्याचे नियोजन ठरवण्याच्या दृष्टीने संयुक्त बैठक होत आहे. यामध्ये महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाच्या प्रतिनिधींना बोलवले आहे. खानापूर बाजार समिती निवडणुकीचे नेतृत्त्व माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांनी करावे. ते सांगतील तेवढ्या जागा आणि पदाधिकारी निवडी करण्यासाठी आम्ही तयार आहोत. परंतु, निवडणूक बिनविरोध करणे बाजार समिती विकासाच्या मुळावर येत आहे. महाविकास आघाडीतून कोणी बाहेर राहिल्यास त्याचे परिणाम राज्य पातळीवर उमटतील. मात्र कोणी अशी विपरीत भूमिका घेतली तरी निवडणूक लढवण्यावर आम्ही ठाम आहोत. निवडणूक बिनविरोध आणि सेटलमेंटमुळे बाजार समितीचे नुकसान झाले आहे. बाजार समिती भ्रष्टाचाराचा अड्डा बनली असल्याची टिका अॅड. मुळीक यांनी केली.

यावेळी विभूते म्हणाले, राज्य पातळीवर महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढण्याचा निर्णय झाला आहे. आपला शत्रू कोण आहे, हे निश्चित आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजप आणि शिंदे गटाशी तडजोड होणार नाही. काँग्रेसच्या शांताराम कदम यांच्याशी बोलणे झाले आहे. ते आजच्या बैठकीला येणार होते. मात्र उद्या आम्ही पुन्हा एकत्रित जिल्हा निवडणुकीसाठी बसणार आहोत. त्यावेळी आम्ही सर्व अहवाल त्यांना सांगणार आहे. स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांना आम्ही बैठकीसाठी निमंत्रण दिले होते. मात्र ते आले नसल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, याबाबत काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुरेश पाटील, माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील आणि गजानन सुतार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, विट्यातील आजच्या बैठकीला आम्हाला बोलावणे आले होते. परंतु आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून आम्हाला काहीही सूचना अथवा निरोप आला नसल्याने बैठकीला गेलो नसल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button