वाळू ओतून पेटविल्या गोण्या ! संगमनेरात गंगामाई घाटावर आंदोलक पर्यावरणप्रेमींनी मांडला तासभर ठिय्या | पुढारी

वाळू ओतून पेटविल्या गोण्या ! संगमनेरात गंगामाई घाटावर आंदोलक पर्यावरणप्रेमींनी मांडला तासभर ठिय्या

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : संगमनेरातील गंगामाई घाटालगत प्रवरानदीरपात्रामधून सतत होणारा बेसुमार वाळू उपसा रोखण्यात अपयश आल्याने संतप्त झालेल्या पर्यावरण प्रेमी नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करीत वाळूच्या भरलेल्या गोण्या नदी पात्रामध्ये ओतून दिल्या. दरम्यान, रिकाम्या गोण्या पेटवून देत त्या गोण्यांची होळी करून, तासभर आंदोलन केले.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेतून जाऊन शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेत आले. भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पा. यांच्यावर महसूल मंत्रीपदाची जबाबदारी आली. त्यांनी नव्या वाळू धोरणाची घोषणा करीत अवैधरित्या होणारी वाळू तस्करी रोखल्याचा दावा केला, मात्र संगमनेर शहरालगत संगमनेर खुर्द, कासारा दुमाला, मंगळापूर, धांदरफळ व सांगवी या भागातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत आहे.

गंगामाई घाट परिसरात प्रवरा नदी पात्रातून बेसुमार होणार्‍या वाळू उपशामुळे गंगामाई घाट अक्षरशः खचला आहे. नदीपात्रातील विहिरीतून जाणार्‍या पाईप लाईनसुद्धा उघड्या पडल्या. विहिरींची पाणी पातळी खालावली आहे. पर्यावरणाच्या होत असलेल्या या र्‍हासाकडे महसूल अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमी नागरिकांनी केला आहे.
दरम्यान, वाळू उपसा बंद न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा महसूल विभागाला दिला होता, मात्र महसूलला कुठल्याही प्रकारचा फरक न पडल्याने अखेर आंदोलन करण्यात आले.

महसूल कर्मचार्‍यांना आंदोलकांनी धरले धारेवर !

गंगामाई घाट परिसरात सकाळी फिरायला येणार्‍या ज्येष्ठ नागरिकांना वाळू तस्करांच्या अरेरावीसह दहशतीचा अनेकदा सामना करावा लागतो. वाळूच्या रिक्षांमुळे जिविताला धोका निर्माण होवू शकतो. त्यामुळे या नागरीकांनी वाळू तस्करांविरूद्ध संघर्ष पुकारला. भरलेल्या वाळूच्या गोण्याखाली करून त्यांनी रिकाम्या गोण्या पेटवून देत होळी केली. यानंतर महसूलचे काही कर्मचारी घटनास्थळी आले. त्यांनाही आंदोलकांनी खडे बोल सुनावत चांगलेच धारेवर धरल्याने वातावरण चांगलेच तापले होते.

वाळू तस्करी न रोखल्यास रिक्षा पेटवून देणार..!
शहरात गंगामाई घाट परिसरात होणारी वाळू तस्करी तुम्हाला न रोखता आल्यास आम्हाला सांगा, आम्ही स्वतः पुढाकार घेऊन वाळू वाहतूक करणार्‍या रिक्षा चालकांच्या रिक्षा पेटवून देऊ. यानंतर होणार्‍या परिणामास तुम्ही सर्वस्वी जबाबदार रहाल, अशी तंबी गंगामाई ट्रस्ट, पुरोहित संघ, संगमनेर व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व ज्येष्ठ नागरीक संघाच्या आंदोलनकर्त्यांनी महसूल अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांना दिला.

Back to top button