नगर : धक्का लागल्याने मिरवणुकीत राडा भिंगारमधील घटना; सहा जणांवर गुन्हा
नगर : पुढारी वृत्तसेवा : महात्मा फुले जयंती मिरवणुकीत धक्का लागल्याच्या कारणावरून मंगळवारी (दि.11) राडा झाला. लाकडी दांडके व रॉडने काही जणांना मारहाण झाल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. भिंगार पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविष्कार संजय पुंड (रा.नागरदेवळे) यांनी फिर्याद दिली आहे.
निलेश पेंडुलकर, सोनू पेंडुलकर (दोन्ही रा.ब्राह्मणगल्ली,भिंगार), अक्षय हंपे (रा.सौरभनगर,भिंगार), अभी शेलार (रा.भिमनगर,भिंगार), रोहित शिर्के (रा.पाटीलगल्ली, भिंगार), आन्या ऊर्फ आनंद नायकू (रा.नेहरू चौक, भिंगार) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सहा आरोपींची नावे आहेत. महात्मा फुले जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत भिंगार, नागरदेवळे परिसरातील मंडळांनी सहभागी झाली होती. मिरवणुकीत नाचत असताना एकमेकांना धक्का लागल्याच्या कारणावरून वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. अविष्कार पुंड व त्यांच्या सहकार्यांना लाकडी दांडके, लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. जखमींनी सिव्हील हॉस्पिटल येथे उपचार घेतल्यानंतर भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक राहुुल गोरे करीत आहेत.