छत्रपती संभाजीनगर : सूर्य कोपला! पारा ४३.५ अंशावर; ५ वर्षातील उच्चांकी तापमानाची नोंद | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : सूर्य कोपला! पारा ४३.५ अंशावर; ५ वर्षातील उच्चांकी तापमानाची नोंद

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात मागील आठवडाभरापासून उन्हाच्या तीव्रतेत सातत्याने वाढ होत आहे. त्यासोबतच दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन वातावरणातील आद्रतेचे प्रमाणही २८ टक्क्यांवर गेल्याने गुरुवारी (दि. २३) शहराचे तापमान तब्बल ४३.५ अंश सेल्सिअसवर पोहचले आहे. त्यामुळे नागरिकांना सूर्य कोपल्याचाच अनुभव आला आहे. दरम्यान, शहरात मागील ५ वर्षातील हे सर्वधिक तापमान असल्याचे चिकलठाणा वेधशाळेच्यावतीने सांगण्यात आले. आतापर्यंत ४१.६ ते ४२.२ अंशावरच तापमान राहिल्याचेही त्यांनी सांगितले.

यंदाच्या वर्षी मार्च महिना सुरू होताच शहराच्या तापमानात हळूहळू वाढ होण्यास सुरूवात झाली. महिनाभरात तापमान ३५ वरून ३९ अंशावर पोहचले. एप्रिल महिन्यात तापमान ३९ ते ४० अंशावरच कायम राहिले. त्यानंतर १६ एप्रिलपासून तापमानाने चाळीशी पार केली. तर १८ एप्रिल रोजी यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमान म्हणजेच ४२.२ अंश सेल्सिअसची नोंद झाली होती. त्यानंतर तापमानात घट होवून २९ एप्रिल रोजी तामपान ४१.४ अंशावर पोहचले होते. एप्रिलअखेरपासून तापमानाची चाळीशी मेच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत कायम राहिली.

दरम्यान, (दि.९) मे रोजी अचानक वातावरणात बदल झाल्याने आणि वादळी वारा आणि ढगाळ वातावरणानंतर अवकाळी पाऊस बसरल्याने तापमान ३६ ते ३८ अंशापर्यंत आले होते. मात्र गेल्या शनिवारपासून शहराच्या तापमानात अचानक उच्चांकी घेण्यास सुरूवात झाली, पारा पुन्हा ४० अंशापार गेला. गुरुवारी तर सूर्य शहरावर कोपल्याचेच चित्र दिसून आले. पारा तब्बल ४३.५ अंश सेल्सिअसवर गेला होता. शिवाय हवेतील सापेक्ष अद्रतेचे प्रमाणही २८ अंशावर आले होते.

सिमेंट रस्त्यांचा परिणाम

शहराच्या तापमानात झालेली वाढ ही मागील ५ वर्षातील उंच्चांकी आहे. शहराच्या काही भागात हे तामपान ४४ अंशापर्यंत गेले असेल. त्याचे एकमेव कारण म्हणजे सिमेंट रस्ते. त्यामुळे तामपान वाढण्याची दाट शक्यता असते, असेही आयएमडीचे वेधशाळा वैज्ञानिक सुधाकर भाले आणि वेध शाळा सहाय्यक सुनील निकाळजे यांनी सांगितले.

मागील तीन वर्षातील तापमान

  • २०२२ – ४२.४ अंश सेल्सिअस
  • २०२३ – ४१.८ अंश सेल्सिअस
  • १८ एप्रिल २०२४ – ४२.८ अंश सेल्सिअस
  • २३ मे २०२४ – ४३.५ अंश सेल्सिअस

Back to top button