पुणे: तब्बल ३४ लाखांचा गुटखा जप्त, भिगवणमध्ये स्थानिक गुन्हे शाखा, पोलिसांची कारवाई | पुढारी

पुणे: तब्बल ३४ लाखांचा गुटखा जप्त, भिगवणमध्ये स्थानिक गुन्हे शाखा, पोलिसांची कारवाई

भिगवण, पुढारी वृत्तसेवा: पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा व भिगवण पोलिसांच्या संयुक्त कारवाईत शहरातील एका हॉटेलच्या पार्किंगमधून गुटख्याने भरलेला एक कंटेनर जप्त केला. तब्बल ३३ लाख ७५ हजार रूपये किमतीच्या गुटख्यासह ७ लाख रुपये किमतीचा कंटेनर असा एकूण ४० लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिगवण पोलिस ठाण्याच्या हद्दीत हॉटेल उदयच्या पार्किंगमध्ये गुटख्याने भरलेला ट्रक उभा असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व भिगवण पोलिसांनी संयुक्तपणे छापा टाकला असता यामध्ये मोठ्या प्रमाणात बंदी असलेला गुटखा आढळुन आला. इब्राहीम अब्दुल रशीद व नवाज लालनसाहब कुरेशी हे दोघे त्यांच्या ताब्यातील कंटेनरमधून हा बेकायदेशीर गुटखा विक्रीस नेते होते. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार स्वप्निल अहिवळे यांनी फिर्याद दिली. हा गुटखा कोठून आणला?, कोणाला विकणार? त्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा व भिगवण पोलिसांकडून तपास सुरू आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलिस उपनिरीक्षक अमित सिद पाटील तसेच स्वप्निल अहिवळे, अभिजीत एकशिंगे, भिगवणचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलिस उपनिरीक्षक रूपेश कदम, रंजित मुळीक, हसीम मुलाणी,अंकुश माने यांनी केली.

आतापर्यंत एक कोटींचा गुटखा जप्त

पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पुणे ग्रामीण जिल्हा पोलिस दलाचा पदभार स्विकारल्यापासून अवैध गुटख्यावर कारवाई सुरू करत मागील तीन महिन्यांत तब्बल एक कोटी रूपयांचा अवैध गुटखा जप्त केला आहे. यापुढे देखील अशाच प्रकारे पुणे ग्रामीण जिल्ह्यात कारवाई सुरूच राहणार, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

 

Back to top button