भोर : हरित महासिटी कंपोस्ट ब्रँड वापरण्यास मंजुरी | पुढारी

भोर : हरित महासिटी कंपोस्ट ब्रँड वापरण्यास मंजुरी

भोर; पुढारी वृत्तसेवा : भोर नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात ओल्या कचर्‍यापासून तयार होणार्‍या कंपोस्ट खतास ‘हरित महासिटी कंपोस्ट‘ हा बँड वापरण्यास राज्य नागरी विकास अभियान संचालनालयाची मान्यता मिळाली आहे. मुख्याधिकारी हेमंत किरूळकर यांनी ही माहिती दिली. भोर नगरपरिषदेतर्फे शहरातून रोज पाच ते सहा टन कचरा संकलित केला जातो. घरोघरी घंटागाडीद्वारे रोज तीन टन ओला आणि दोन टन सुका, घातक कचरा गोळा केला जातो.

त्यावर प्रक्रिया करण्यासाठी नगरपरिषदेने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारला आहे. मशिनरीच्या साहाय्याने शास्त्रोक्त पद्धतीने ओल्या कचर्‍यापासून कंपोस्ट खत तयार केले जाते. महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील मृदाविज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागात खत (नियंत्रण) आदेशातील तरतुदीनुसार प्रत्येक महिन्याला कंपोस्ट खताची तपासणी करण्यात येते. खत (नियंत्रण) आदेश कायद्यातील निकष पूर्ण केल्याने शासनाने ‘हरित महासिटी कंपोस्ट‘ ब्रॅंड वापरण्यास भोर नगरपरिषदेला परवानगी दिली आहे.

शेतात वापर करण्याचे आवाहन
भोर नगर परिषदेच्या कंपोस्ट खतामध्ये शेतजमिनीला आवश्यक घटक मूलद्रव्ये आहेत. जड धातूचे कोणतेही घटक नाहीत. या खतनिर्मितीमध्ये कोणत्याही रासायनिक घटकाचा वापर करण्यात आलेला नाही. शेतीमध्ये या खताचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले आहे.

भोर नगरपरिषदेला ‘हरित महासिटी कंपोस्ट‘ ब्रँडची मान्यता मिळाली आहे. शहरातील शेतकर्‍यांना कमी खर्चात कंपोस्ट खत उपलब्ध होणार आहे. याचा लाभ शेतकर्‍यांनी घ्यावा.

                             – निर्मला आवारे, नगराध्यक्षा, भोर नगरपरिषद.

Back to top button