नानगाव : मधव्या बहिणीची होते एक वर्षाने भेट | पुढारी

नानगाव : मधव्या बहिणीची होते एक वर्षाने भेट

राजेंद्र खोमणे

नानगाव (ता. दौंड) : नानगाव(ता. दौंड) व वडगाव रासाई (ता. शिरूर) येथील ग्रामदेवता श्री रासाईदेवी मातेचा यात्रा उत्सव चैत्र पौर्णिमेला सुरू होतो. यात्रेच्या पहिल्या दिवशी दोन्ही गावांतील श्री रासाईदेवी आपली मधवी बहीण भीमा नदीपात्रातील श्री रासाईदेवीच्या भेटीसाठी पालखीतून जातात. नानगाव, वडगाव रासाई व भीमा नदीपात्रातील रासाईदेवीमाता या तिन्ही बहिणी आहेत.

वडगाव रासाई थोरली, भीमा नदीपात्रातील मधवी व नानगाव येथील धाकटी बहीण आहे. चैत्र पौर्णिमेला श्री रासाईदेवी मातेची दोन्ही गावांत मोठ्या भक्तिमय वातावरणात यात्रा सुरू होते. यात्राउत्सवाच्या पहिल्या दिवशी दुपारी बाराच्या सुमारास वडगाव रासाई येथील ग्रामदेवता श्री रासाईदेवीमातेची पालखी भीमा नदीपात्रातील मधव्या बहिणीला भेटायला येते.

नानगाव येथील ग्रामदेवता श्री रासाईदेवी मातेची पालखी सायंकाळी सहाच्या सुमारास भीमा नदीपात्रातील मधव्या बहिणीला भेटण्यासाठी पालखीतून जाते. यात्रा उत्सवाच्या पहिल्या दिवशी मधव्या बहिणीला भेटण्यासाठी दोन्ही देवी जातात. तीनही बहिणींची एकत्रितपणे कधीही भेट होत नाही. वर्षातून एकदा मधव्या बहिणीला भेटण्यासाठी नानगाव व वडगाव रासाई येथील श्री रासाईमाता जात असते.

बहीण भेटीचा सोहळा पाहाण्यासाठी दोन्ही गावांतील नागरिक व पंचक्रोशीतील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित असतात. यात्रा उत्सव काळात दोन्ही गावांतील नागरिक व पंचक्रोशीतील भक्तगण भीमा नदीपात्रातील श्री रासाईदेवीचे दर्शन घेण्यासाठी होडीतून जातात.

Back to top button