कोल्हापूर : ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’, जोतिबा यात्रेत लाखो भाविकांची मांदियाळी | पुढारी

कोल्हापूर : 'जोतिबाच्या नावानं चांगभलं', जोतिबा यात्रेत लाखो भाविकांची मांदियाळी

कोल्हापूर/जोतिबा; पुढारी वृत्तसेवा :  ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं… केदारनाथाच्या नावानं चांगभलं…’ असा अखंड गजर, राजेशाही थाटात निघालेली सासनकाठ्यांची मिरवणूक, ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक पी-ढबाकचा सूर, गुलाल-खोबर्‍याची उधळण करत लाखो भाविकांच्या उपस्थितीत जोतिबा डोंगरावर बुधवारी दख्खनचा राजा श्री जोतिबाची चैत्र यात्रा उत्साहात झाली. तीन वर्षांनी पूर्ण क्षमतेने यात्रा भरली होती. महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध— प्रदेशातूनही भाविक यात्रेत सहभागी झाले होते. नेटक्या नियोजनामुळे मंदिर आवारात गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात प्रशासनाला यश आले.

यात्रेसाठी भाविकांनी दोन दिवसांपासून जोतिबा डोंगरावर गर्दी करण्यास सुरुवात केली होती. दुचाकी, चारचाकी पार्किंगसाठी 32 ठिकाणे उपलब्ध करून देण्यात आली होती. पार्किंगपासून भाविकांना मंदिर परिसरापर्यंत मोफत बसने सोडण्यात येत होते.

शासकीय महाभिषेक सोहळा

बुधवारी पहाटे पाद्यपूजा, काकड आरती सोहळा झाला. पन्हाळा तहसीलदार रमेश शेंडगे यांच्या हस्ते जोतिबा देवास शासकीय महाभिषेक करण्यात आला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, देवस्थानचे सचिव सुशांत बनसोडे, मंदिर व्यवस्थापक दीपक म्हेतर उपस्थित होते. दर्शनासाठी रात्रभर भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. पी-ढबाक, हलगीच्या गजरात सकाळपासूनच सासनकाठ्या मंदिरात येत होत्या.

पालकमंत्र्यांच्या हस्ते पूजन

दुपारी 12 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास जोतिबा उत्तरद्वारासमोर पाडळी (ता. सातारा) येथील मानाच्या पहिल्या सासनकाठीचे पूजन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई, आमदार सतेज पाटील, कराडचे आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे, शाहूवाडी-पन्हाळा प्रांताधिकारी अमित माळी, जोतिबा मंदिराचे व्यवस्थापक दीपक म्हेतर, अंबाबाई मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे उपस्थित होते. यापाठोपाठ दुसर्‍या मानाच्या सासनकाठीचे (वेल्हे, ता. पाटण) पूजन केल्यानंतर सासनकाठ्यांची शाही मिरवणूक सुरू झाली. प्रथेप्रमाणे यमाई मंदिराकडे ही मिरवणूक मार्गस्थ झाली.

राजेशाही थाटातील पूजा

चैत्र यात्रेनिमित्त जोतिबाची राजेशाही थाटातील पूजा बांधण्यात आली होती. पगडी परिधान केलेली सिंहासनारूढ दख्खनच्या राजाची मूर्ती प्रसन्न दिसत होती. ही पूजा पुजारी प्रवीण कापरे, विशाल ठाकरे यांनी बांधली.

पालखी सोहळ्याला सुरुवात

मानाच्या सर्व सासनकाठ्या यमाई मंदिराकडे पोहोचल्या. सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास तोफेची सलामी दिल्यानंतर जोतिबा पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. यमाई मंदिराकडे पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर पहिला विसावा कमलाकर मिटके (राजाज्ञे) यांच्या इथे झाला; तर दुसरा विसावा पागोता येथे झाला. सूर्यास्तानंतर दिवटीच्या प्रकाशात जोतिबा देवाचा पालखी सोहळा यमाई मंदिरात आला. तिथे यमाई (रेणुका) व कट्याररूपी जमदग्नी विवाह विधी पार पडल्यानंतर रात्री आठ वाजता पालखी जोतिबा मंदिराकडे परत आली. रात्री 9 वाजता जोतिबा मंदिरातील सदरेवर जोतिबा राजा विराजमान झाला. रात्री आरती, नाथांना शाहीस्नान, असे धार्मिक विधी मंदिरात झाले.

वाहतूक नियंत्रण सुटसुटीत

देवस्थान समिती, पोलिस प्रशासन व जिल्हा परिषदेच्या वतीने यंदा जोतिबा डोंगरावर 32 ठिकाणी पार्किंग उपलब्ध करून देण्यात आले होते. यामुळे डोंगरावरील वाहतूक कोंडी टाळण्यात यश आले. दर्शन मंडपातून दर्शन रांग, जागोजागी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, शौचालये, वाहनतळापासून मोफत बस वाहतूक सेवा, यामुळे भाविकांना चांगल्या सोयी उपलब्ध झाल्या.

भाविकांसाठी अन्नछत्र

विविध सेवाभावी संस्था-संघटनांच्या वतीने जोतिबा डोंगर व यात्रामार्गावर विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या. सहज सेवा ट्रस्ट, शिवाजी चौक तरुण मंडळ, आर. के. मेहता ट्रस्ट, पाटीदार समाज, पटेल समाज यांच्या वतीने नाश्ता, जेवण, सरबत वाटप करण्यात आले. या अन्नछत्रांच्या ठिकाणी मसाले भात, जिलेबी, शिरा, भाजी, आमटी, भजी, मठ्ठा अशा भोजनाचा समावेश होता. तीन दिवसांत अडीच ते तीन लाख भाविकांनी अन्नछत्राचा लाभ घेतला.

मोफत दुचाकी दुरुस्ती ते वैद्यकीय सेवा

जिल्हा टू व्हीलर, फोर व्हीलर असोसिएशनच्या सदस्यांनी मोफत दुचाकी, चारचाकी दुरुस्ती, पंक्चर काढून देण्याची सेवा दिली. झंवर उद्योग समूह व श्रीराम फौंड्री यांच्या वतीने पंचगंगा नदी ते जोतिबा डोंगरपर्यंत मोफत बससेवा देण्यात आली. व्हाईट आर्मीच्या वतीने सेंट्रल प्लाझा येथे वातानुकूलीत रुग्णालय उभारण्यात आले होते. या ठिकाणी 100 डॉक्टरांचे पथक कार्यरत होते. मंदिर आवारातील ओवरींमध्ये तसेच मुख्य चौकांमध्ये रुग्णवाहिकांमध्ये वैद्यकीय पथके तैनात होती. यामध्ये भारती विद्यापीठ, रोटरी क्लब, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल यांच्या वतीने मोफत वैद्यकीय सुविधा पुरविण्यात आल्या.

मंदिरातील गर्दीवर नियंत्रण

मंदिरात गाभार्‍यातील दर्शनासाठी दक्षिण दरवाजाकडून दर्शन मंडपामध्ये भाविकांना सोडण्यात येत होते. तेथून रामलिंग मंदिर, शिंदे ट्रस्ट येथील तात्पुरत्या पुलावरून भाविक थेट गाभार्‍याकडे जात होते. मंदिरात दक्षिण दरवाजाकडून येणार्‍या भाविकांना मंदिराच्या डाव्या बाजूने उत्तर दरवाजाकडे पाठविले जात होते. उजवी बाजू मानाच्या सासनकाठ्यांसाठी राखीव ठेवण्यात आली होती. यामुळे मंदिराभोवती प्रतिवर्षी होणारी गर्दी, चेंगराचेंगरीचे प्रकार रोखण्यात आले.

संशयित महिला ताब्यात

स्थानिक गुन्हे शाखेचे अनेक पोलिस साध्या वेशात, तर काही यात्रेकरूंच्या वेशात गर्दीमध्ये सहभागी झाले होते. साखळी चोरी, बॅग लंपास करण्याच्या प्रयत्नात असणार्‍या संशयित महिलांना या पथकाने ताब्यात घेण्यास सुरुवात केली. या महिलांना पकडून पोलिस ठाण्यात आणण्यात येत होते. त्यांची कसून चौकशी सुरू होती.

Back to top button