Forbes List : Zerodha फर्मचा मालक करत होता आठ हजारांची नोकरी; बनला भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश | पुढारी

Forbes List : Zerodha फर्मचा मालक करत होता आठ हजारांची नोकरी; बनला भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश

पुढारी ऑनलाईन डेस्क : फोर्ब्सने (Forbes List) जगातील सर्वात श्रीमंत अब्जाधीशांची २०२३ ची यादी जाहीर केली. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी भारतीय श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत. या यादीतील सर्वात मोठे यश ब्रोकिंग फर्म झेरोधाचे सह-संस्थापक निखिल आणि नितीन कामथ या दोन भावंडांनी यांनी मिळवले आहे. फोर्ब्सच्या यादीत सर्वात तरुण अब्जाधीश म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. ८,००० रुपये पगार घेणारा तरुण ते भारतीय अब्जाधीश होण्यापर्यंतचा निखिल यांचा प्रवास खूपच रंजक आहे. जाणून घेऊया त्यांच्याविषयी अधिक माहिती…

फोर्ब्सच्या मते, बेंगळुरूमधील नितीन आणि निखिल या दोन भावांची एकूण संपत्ती अनुक्रमे $1.1 अब्ज आणि $2.7 अब्ज आहे. निखिल कामतचा शाळा सोडल्यापासून अब्जाधीश होण्याचा प्रवास खूप खडतर आहे. झेरोधाचे सह-संस्थापकांनी कठोर परिश्रमाने यशाचे शिखर गाठले आहे. त्यांची कंपनी सध्या देशातील सर्वात वेगाने वाढणारी स्टॉक ब्रोकिंग कंपनी आहे. (Forbes List)

कॉल सेंटरमध्ये केली पहिली नोकरी

ह्युमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत आपल्या प्रवासाबद्दल बोलताना निखिल कामथ यांनी सांगितले की, त्यांनी वयाच्या १७ व्या वर्षी काम करायला सुरुवात केली. त्यांनी पहिली नोकरी एका कॉल सेंटरमध्ये केली होती. त्यावेळी त्यांना फक्त ८ हजार रुपये पगार मिळायचा. यानंतर शेअर मार्केट ट्रेडिंगला सुरुवात केली आणि श्रीमंत होण्याच्या स्वप्नाला सुरुवात केली. निखिल कामथ यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्यांनी शेअर ट्रेडिंग सुरू केली तेव्हा त्यांनी ते गांभीर्याने घेतले नाही. मात्र, वर्षभरात त्यांना बाजारपेठेची संपूर्ण माहिती मिळवली आणि त्यांनी त्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही, त्यांची संपत्ती एवढ्या वेगाने वाढली की आज ते देशातील सर्वात तरुण अब्जाधीश म्हणून समोर आले आहेत.

वडिलांच्या विश्वासाने धीर दिला

मुलाखतीत निखिल कामथ यांनी सांगितले होते की, एकदा त्याच्या वडिलांनी निखिल यांना आपल्या बचतीपैकी काही रक्कम योग्य व्यवस्थापन करण्याची जबाबदारी दिली होती. कामत यांनी ही रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतविण्यास सुरुवात केली. शेअर मार्केटमधील प्रवेशाचे हे त्यांचे पहिले पाऊल होते. हळुहळू निखिल आणि नितीन दोघांनी मार्केटवर पकड ठेवली. शेअर बाजारातील सर्व बारकावे समजून घेतल्यानंतर जेव्हा त्यांची भरपूर कमाई होऊ लागली, तेव्हा त्यांनी कामावर जाणे बंद केले आणि इथूनच त्यांच्या यशाची सुरुवात झाली.

‘माझ्या संघर्षातून खूप काही शिकलो’

नोकरी सोडल्यानंतर निखिल कामथ यांनी त्यांचा मोठा भाऊ नितीन कामत यांच्यासोबत कामत असोसिएट्सची सुरुवात केली आणि या माध्यमातून ते शेअर मार्केटमध्ये व्यवहार करायचे. यानंतर २०१० मध्ये दोन्ही भावांनी मिळून झेरोधा सुरू ट्रेडिंग ब्रोकिंग कंपनी सुरु केली. त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासाबाबत निखिल सांगतात की, ”आमच्या संघर्षातून आम्हाला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. आज मी कदाचित अब्जाधीश झालो आहे, पण यानंतरही काहीही बदलले नाही. आजही मी ८५% दिवस काम करतो.”

हेही वाचा

Back to top button