पुढारी ऑनलाईन डेस्क : अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी फ्रेंच क्लब पॅरिस सेंट जर्मेन (PSG) सोडण्याचा विचार करत आहे. त्याचा क्लबसोबतचा करार जूनमध्ये संपणार आहे. पीएसजी मेस्सीसोबत नवीन करार करण्यास तयार आहे. परंतु, मेस्सीने त्याला अजून सहमती दर्शवलेली नाही. दरम्यान, मेस्सीचा जुना क्लब बार्सिलोनानेही त्याला ऑफर दिली आहे. यांच्यासह सौदी अरेबियाच्या क्लब अल हिलालने मेस्सीला ३६०० कोटी रुपयांची विक्रमी ऑफर दिली आहे. (Messi in Asia)
पीएसजीकडून जगातील दिग्गज खेळाडू खेळतात. यामध्ये फ्रान्सचा कर्णधार आणि युवा स्टार किलियन एम्बाप्पे, ब्राझीलचा नेमार ज्युनियर आणि स्पेनचा माजी कर्णधार सर्जिओ रामोस आहेत. असे दिग्गज खेळाडूंचा संघात समावेश असूनही पीएसजी सलग दुसऱ्यांदा UEFA चॅम्पियन्स लीगमधून बाहेर पडली आहे. (Messi in Asia)
पीएसजीच्या संघातील खेळाडूंमध्ये समन्वयाचा अभाव आहे. यामुळे मेस्सी निराश आहे. त्याचबरोबर सध्याचे प्रशिक्षक क्रिस्टोफ गॉल्टियर यांच्या संघनिवडीवर आणि त्यांच्या योजनांवर तो खूश नाही. या गोष्टींना मागे सोडूनही मेस्सीला पीएसजीसोबतच पुढे खेळायचे होते.
प्रसिद्ध फुटबॉल पत्रकार फॅब्रिजियो रोमानो यांनी मंगळवारी (दि. ४ एप्रिल) खुलासा केला की, सौदी अरेबियाच्या अल हिलाल क्लबने अधिकृतपणे लिओनेल मेस्सीला क्लबमध्ये सामील होण्याची ऑफर दिली आहे. अल-हिलालने मेस्सीला दरवर्षी ४०० दशलक्ष युरो (सुमारे ३६०० कोटी रुपये) देण्याची चर्चा केली आहे. मेस्सीने अद्याप या ऑफरबद्दल काहीही विचार केलेला नाही.
मेस्सी अल हिलालमध्ये गेला तर त्याची युरोपियन फुटबॉलमधील कारकीर्द जवळपास संपुष्टात येईल. फॅब्रिजियो रोमानो म्हणाले की, मेस्सीला अजूनही युरोपमध्ये खेळायचे आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या कोपा अमेरिका स्पर्धेच्या तयारीसाठी त्याला सर्वोच्च स्तरावर फुटबॉल खेळायचा आहे. अशा परिस्थितीत युरोपबाहेरील कोणत्याही क्लबशी करार करणे त्याच्यासाठी कठीण आहे.
२००० मध्ये, लिओनेल मेस्सीने वयाच्या १३ व्या वर्षी बार्सिलोनासोबत करार केला होता. वयाच्या १६ व्या वर्षी त्याला बार्सिलोनाच्या वरिष्ठ संघात खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर तो १७ वर्षे बार्सिलोनाकडून खेळला. २०२० मध्ये त्याचा करार संपला तेव्हा त्याने संघाचा निरोप घेतला.
मेस्सीने पीएसजी सोडण्याचा निर्णय घेतल्यास तो त्याच्या माजी क्लब बार्सिलोनामध्ये परतण्याची शक्यता आहे. बार्सिलोनाचे प्रशिक्षक जावी हर्नांडेझ यांनी मेस्सीशी अनेकदा बोलले आहे. मेस्सी झॅवीच्या नेतृत्वाखाली खेळला आहे. दोघेही खूप चांगले मित्र आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, झॅवीने ड्रेसिंग रूममधील सर्व खेळाडूंशीही याबद्दल बोलले आहे. बार्सिलोनाचे खेळाडूही मेस्सीच्या पुनरागमनासाठी उत्सुक आहेत.
बार्सिलोना क्लबचे उपाध्यक्ष राफा युस्टेस यांनी सांगितले की, क्लब मेस्सीच्या संपर्कात आहे. "आम्हाला त्याला संघात परत आणायचे आहे. लिओनेल मेस्सीला माहित आहे की, आपण त्याचा किती आदर करतो. आम्हाला खात्री आहे की, मेस्सीला बार्सिलोना क्लब शहर आवडते. त्यामुळे आम्हाला योग्य परिस्थिती निर्माण करायची आहे जेणेकरून तो संघात परत येईल.
हेही वाचा;