मडगाव : मँगनिज खाणीमुळे कावरेचे अस्तित्व धोक्यात; मायणा येथे ११ एप्रिल रोजी जनसुनावणी घेण्याच्या पंचायतीला सूचना | पुढारी

मडगाव : मँगनिज खाणीमुळे कावरेचे अस्तित्व धोक्यात; मायणा येथे ११ एप्रिल रोजी जनसुनावणी घेण्याच्या पंचायतीला सूचना

मडगाव; पुढारी वृत्तसेवा : सांगे मतदारसंघाला निसर्गाने भरभरून दिले आहे. सांगेच्या प्रत्येक पंचायत क्षेत्राचे स्वतःचे वेगळेपण आहे. उगे पंचायत साळावली धरणासाठी, नेत्रावळी पंचायत राखीव वनक्षेत्रासाठी तर वाडे कुर्डी पंचायत गान तपस्विनी मोगुबाई कुर्डीकर यांच्या पाण्यात बुडालेल्या पुरातन कुर्डी गावासाठी ओळखली जाते. आमदार सुभाष फळदेसाई यांचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाणारे कावरे पिर्ला पंचायत क्षेत्र जैवविविधतेने नटलेले आहे. मल्लिकार्जुन आणि महामाया आदी ग्रामदेवतांबरोबर जागृत, पवित्र देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्राचीन देवस्थानांमुळे कावरे गावाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. अशा या काशीपुरीसाचे पावित्र्य राखण्यासाठी कोणीही त्या डोंगरावर जाण्याचे धाडस करत नाही; पण याच डोंगराच्या माथ्यावर अचानक मँगनिजची खाण सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने गावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

कावरे गावात यापूर्वी खाणी सुरू होत्या; पण त्या खाणींमुळे गावाच्या अस्तित्वावर कधीच प्रशचिन्ह निर्माण झाले नव्हते. आता तर खाणी सुरू होण्याची चिन्हेही नाहीत, तरीही अचानक केपेच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी जांबळीदडगा देवापात्र दोंगोर येथे मँगनिज खाण सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून खास ग्रामसभा घेण्यासाठी कावरे-पिर्ला पंचायतीशी पत्रव्यवहार केल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे.
रविवारी (दि. २) पंचायतीने ग्रामसभा घेऊन खाणीला विरोध केला असला, तरीही अजून तो धोका टळलेला नाही. खाण सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी की नाही यावर निर्णय घेण्यासाठी ११ एप्रिल रोजी मायणा येथे जनसुनावणी घेण्याच्या सूचना पंचायतीला करण्यात आल्या आहेत. कावरे गावातून खाणीला विरोध होत असला, तरीही काही गावाबाहेरचे काही घटक ही मँगनिज खाण सुरू करण्याच्या समर्थनार्थ आहेत. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण आहे.

ज्या जांबळीदडगा देवापात्र डोंगरावर मँगनिजची खाण सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्या देवापात्र डोंगरावर देवाचे अस्तित्व असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. गुरुदास वेळीप, उत्तम वेळीप, गोकुळदास वेळीप, कुष्टा वेळीप, बाबूसो वेळीप, प्रभाकर वेळीप आणि आनंद गावकर या ग्रामस्थांनी कावरे गावासंदर्भात तयार केलेल्या खास अहवालात त्या डोंगरावरील पुरातन आणि गुप्त देवस्थानांचा उल्लेख केला आहे. मँगनिजच्या खाणीसाठी प्रस्तावित डोंगराखाली काशी पुरीसाचे लिंग आहे. गावातील पूर्वजांना कुमेरी शेतीसाठी साफसफाई करताना हे लिंग आढळले होते. कोयता लागल्याने त्या पुरीसाच्या डोकीतून रक्त वाहू लागले होते, अशी आख्यायिका आहे. हे स्थान जागृत म्हणून ओळखले जाते. त्या डोंगरावर जाताना पायात वहाणा घालता येत नाही. शिव्या देणे, थुंकणे किंवा मूत्रविसर्जन करण्यास तिथे मनाई आहे. केवळ १४ वर्षांखालील मुलांना तिथे पूजा करता येते. डोंगरावरील नैसर्गिक झरीचे पाणी काशी पुरीसाच्या डोकीवर पडून नंतर मल्लिकार्जुन मंदिरापर्यंत येते, अशी माहिती नगरसेवक प्रसाद फळदेसाई यांनी दिली. सरपंच विधी वेळीप यांनी डोंगरावर खाण सुरू झाल्यास सर्व झरी सुकून जातील, अशी भीती व्यक्त केली.

Back to top button