…तरीही, विरोधक गप्पच कसे? पिंपरी-चिंचवड महापालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा | पुढारी

...तरीही, विरोधक गप्पच कसे? पिंपरी-चिंचवड महापालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  वादग्रस्त ठरलेली यांत्रिक पद्धतीने (रोड स्वीपर मशिन व्हेईकल) रस्ते सफाईचे काम तब्बल 59 कोटी वाढीव खर्चाने करण्याचा घाट पिंपरी-चिंचवड महापालिकेने घातला आहे. त्यासंदर्भात सत्ताधारी लोकप्रतिनिधीने तक्रार करूनही विरोधकांनी चुप्पी साधली आहे. त्यामुळे या वाढीव दराच्या कामात विरोधकही सामील आहेत का, अशी शंका निर्माण झाली आहे. महापालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली आहे.

भाजपच्या सत्ताकाळात शहरातील 18 मीटर व 18 मीटरपेक्षा अधिक रुंदीचे रस्ते यांत्रिक पद्धतीने साफसफाई काम सर्वसाधारण सभेत अनेकदा फेटाळून लावण्यात आले. मात्र, महापालिकेत नगरसेवक व पदाधिकारी नसल्याने प्रशासकीय राजवटीत या वादग्रस्त कामाच्या निविदेस मंजुरी देण्यात आली. शहरातील चार वेगवेगळ्या विभागानुसार करण्यात येणार्‍या या कामाची तत्त्वत: वर्कऑर्डरही देण्यात आली आहे. जून महिन्याच्या सुरुवातीपासून हे काम प्रत्यक्ष सुरू करण्याचा घाट महापालिका प्रशासनाने घातला आहे.

मात्र, हे काम तब्बल 59 कोटीने वाढविण्यात आल्याचा गंभीर आरोप सत्ताधारी भाजपच्या लोकप्रतिनिधीने केला आहे. सन 2019 च्या निविदेत रोड स्वीपरच्या प्रतिकिलोमीटरला 1 हजार 434 रुपये असा दर होता. सन 2022 च्या निविदेत हा दर 1 हजार 779 असा वाढला आहे. निविदेत अटी व शर्ती बदलल्याने स्पर्धा न झाल्याने प्रतिकिलोमीटर 345 रुपये जादा दर प्राप्त झाला आहे. त्यामुळे दररोज 2 लाख 31 हजार 150 रुपये पालिकेचे नुकसान होणार आहे. वर्षाला 8 कोटी 43 लाख 69 हजार 750 रुपयांचे पालिकेचे नुकसान आहे. या कामाची मुदत 7 वर्षे असल्याने या एकूण कालावधीत 59 कोटी 5 लाख 88 हजार 250 रुपयांचा आर्थिक तोटा पालिकेस सहन करावा लागणार आहे.

तब्बल 59 कोटी वाढीव दराची ही निविदा रद्द करून फेरनिविदा काढण्याची तक्रार भाजपच्या लोकप्रतिनिधीने केली आहे. हा भाजपला घरचा आहेत. त्यामुळे विरोधकांना आयतेच कोलीत मिळाले होते. मात्र, विरोधकांनी या प्रकरणी आपली भूमिकाच स्पष्ट केलेली नाही. विरोधकांची या प्रकरणात साधलेली चुप्पी शंका निर्माण करणार आहे. या कामात विरोधकही सामील असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.

Back to top button