Rohit Sharma : रोहित शर्माच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद | पुढारी

Rohit Sharma : रोहित शर्माच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रीमियर लीग 2023 चा पाचवा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात आरसीबीने मुंबईवर दणदणीत विजय नोंदवला. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) संघाने प्रथम फलंदाजी करताना 171 धावा केल्या. त्यानंतर आरसीबीने विजयासाठी 172 धावांचे लक्ष्य 2 गडी गमावून पूर्ण केले. या सामन्यादरम्यान मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला. स्ट्राईक रेटने निच्चांकी आकड गाठण्याच्या बाबतीत तो आयपीएलचा पहिला कर्णधार बनला आहे.

सर्वात खराब स्ट्राइक रेट

डावाची सलामी देण्यासाठी आलेला रोहित शर्माला (Rohit Sharma) आरसीबीच्या गोलंदाजांनी जखडून ठेवले. त्यामुळे हिटमॅनला फ्री हँड खेळता आले नाही. तो आरसीबीच्या गोलंदाजांविरुद्ध खूप संघर्ष करताना दिसला. 10 चेंडूत 1 धावा काढून रोहित माघारी परतला. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 10 होता. 10 चेंडू खेळल्यानंतर आयपीएलमधील कोणत्याही संघाच्या कर्णधाराचा हा सर्वात खराब स्ट्राइक रेट आहे. एवढेच नाही तर 2022 मध्येही रोहित शर्माने दोन सामन्यांमध्ये अशीच कामगिरी केली होती. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात त्याचा स्ट्राइक रेट 15.38 होता आणि कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात त्याचा स्ट्राइक रेट 25 होता.

पराभवाने सुरुवात

आयपीएल 2022 मध्येही मुंबई इंडियन्सची सुरुवात पराभवाने झाली. गेल्या वर्षी ब्रेबॉर्न येथे झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रोहितच्या (Rohit Sharma) संघाचा 4 गडी राखून पराभव केला होता. रोहितच्या संघाची कामगिरी गेल्या हंगामात सर्वात खराब झाली होती. आयपीएल 2022 मध्ये पॉइंट टेबलमध्ये मुंबईचा संघ शेवटच्या म्हणजे 10व्या क्रमांकावर घसरला होता. गेल्या वर्षी रोहितच्या संघाला 14 पैकी केवळ 4 सामने जिंकता आले होते. पण आयपीएलच्या 16व्या मोसमात मुंबई इंडियन्सला गेल्या वर्षीची कामगिरी विसरून मोठी मजल मारणे आवश्यक आहे.

 

Back to top button