RCB IPL 2023 : विजयानंतरही RCB चे टेन्शन वाढले! ‘हा’ स्टार खेळाडू जायबंदी | पुढारी

RCB IPL 2023 : विजयानंतरही RCB चे टेन्शन वाढले! ‘हा’ स्टार खेळाडू जायबंदी

पुढारी ऑनलाईन डेस्क : RCB IPL 2023 : रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB)ने आयपीएलच्या 16 व्या सीझनची धमाकेदार सुरुवात केली. विराट कोहलीच्या संघाने पहिल्याच सामन्यात पाचवेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सला पराभवाची धुळ चारली. पण विजय मिळवूनही आरसीबीला मोठा धक्का बसला आहे. रजत पाटीदार आणि जोश हेजलवुड यांच्या दुखापतीने आधीच त्रस्त असताना त्यांचा आणखी एक स्टार खेळाडू जायबंदी झाला आहे, त्यामुळे आरसीबीचे टेन्शन वाढले आहे.

इंग्लंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज रीस टोपले याला मुंबईविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली. शानदार सुरुवात केल्यानंतर क्षेत्ररक्षणादरम्यान हा खेळाडू जखमी झाला. यामुळे तो संपूर्ण सामन्यातून बाहेर पडला. रीस टोपलेने आयपीएल 2023 मधील दुसरा सर्वात महागडा खेळाडू कॅमेरॉन ग्रीनला आपल्या दुसऱ्याच षटकात क्लीन बोल्ड केले. त्याने दोन षटकांत 14 धावांत एक बळी घेतला आणि मोहम्मद सिराजच्या साथीने भेदक मारा केला. या दोघांनी मुंबईच्या आघाडीच्या फळीला अडचणीत आणले. पण 8 व्या षटकात शॉर्ट फाईन लेगवर क्षेत्ररक्षण करताना टोपलेच्या खांद्याला दुखापत झाली. त्यामुळे तो मैदानाबाहेर गेला. यानंतर तो संपूर्ण सामन्यातून बाहेर पडला. (RCB IPL 2023)

दिनेश कार्तिकने दिली अपडेट

टोपलेच्या दुखापतीमुळे आरसीबीची चिंता नक्कीच वाढली आहे. त्याच्या दुखापतीवर आरसीबीचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने सामन्यानंतर सांगितले की, टोपलेच्या खांद्याला दुखापत झाली आहे आणि सामन्यादरम्यानच त्याला स्कॅनसाठी नेण्यात आले. त्याची दुखापत गंभीर आहे की नाही हे अद्याप समजू शकलेले नाही. वैद्यकीय पथक त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. जर टोपलेची दुखापत गंभीर असेल तर आरसीबीसाठी वेगवान गोलंदाजीवरचा ताण वाढेल, अशी भीती त्याने व्यक्त केली. (RCB IPL 2023)

आयपीएल सुरू होण्यापूर्वीच दुखापतींनी जवळपास प्रत्येक संघाला हैराण केले आहे. यात आरसीबीचे रजत पाटीदार आणि जोश हेजलवुडच्या दुखापतींशी झुंजत आहे. दुसरीकडे, पहिल्याच सामन्यात क्षेत्ररक्षण करताना दुखापत झालेला गुजरात टायटन्सचा केन विल्यमसन संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर, मुकेश चौधरी, ऋषभ पंत, झाय रिचर्डसन हे खेळाडूही दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर आहेत. लखनौ संघाला मोहसीन खानशिवाय खेळावे लागत असल्याने आता राजस्थान रॉयल्सलाही कुलदीप सेनची चिंता सतावत आहे. अशा स्थितीत फिटनेसचा प्रश्न जवळपास सर्वच संघांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.

Back to top button