तीन दिवसांत 4 कोटींचे दान दोन लाख भाविक साईचरणी नतमस्तक | पुढारी

तीन दिवसांत 4 कोटींचे दान दोन लाख भाविक साईचरणी नतमस्तक

शिर्डी : पुढारी वृत्तसेवा :  श्रीरामनवमी उत्सव कालावधीच्या तीन दिवसांत शिर्डीच्या साईबाबा चरणी सुमारे 2 लाख भाविकांनी नतमस्तक होत 4 कोटीचे दान दिले. संस्थानचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी ही माहिती दिली. शिर्डीत 29 ते 31 मार्च या कालावधीत श्रीराम नवमी उत्सव उत्साहात पार पडला. उत्सव काळात श्रीसाईभक्तांकडून श्रीसाईबाबा संस्थानला विविध माध्यमांद्वारे भरभरुन देणगी मिळाली. सःशुल्क व ऑनलाईन पासेसद्वारे 61.43 लाख 800 रुपये देणगी मिळाली. श्रीसाई प्रसादालयात उत्सव काळात 1 लाख 85 हजार 413 साईभक्तांनी प्रसाद भोजन तर 32 हजार 530 साईभक्तांनी अन्न पाकिटांचा लाभ घेतला. 32 हजार 500 तीन लाडू असलेली पाकीटे आणि एक लाडू असलेली 3 लाख 39 हजार 590 पाकिटांची विक्री झाली. त्यातून संस्थानला 42 लाख रुपये प्राप्त झाले.

सव्वा लाख मोफत
बुंदी प्रसाद पाकिटांचे दर्शन रांगेतून साईभक्तांना वाटप करण्यात आले. श्रीरामनवमी उत्सव कालावधीत साई आश्रम भक्तनिवास, द्वारकामाई भक्तनिवास, साई धर्मशाळा, श्रीसाईबाबा भक्त निवास्थान (500 रुम) व साईप्रसाद निवास आदी निवास्थानांव्दारे 43 हजार 424 साईभक्तांची निवास व्यवस्था करण्यात आली. अतिरिक्त निवास व्यवस्थेसाठी उभारलेल्या मंडपात 5 हजार 954 भक्तांची निवासाची व्यवस्था करण्यात आली होती, असे जाधव यांनी सांगितले.

17 तोळे सोने, पावणेदोन कोटी रोकड
दानपेटीत 1 कोटी 82 लाख रुपये, देणगी काउंटरद्वारे 76 लाख 18 हजार, डेबीट/क्रेडिट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक / डीडी, मनी ऑर्डरद्वारे 1 कोटी 41 लाख रुपये देणगी रोकड स्वरुपात प्राप्त झाली. 171.150 ग्रॅम सोने (रुपये 8.64 लाख रु.) चांदी 2713 ग्रॅम (1 .21 लाख रुपये) अशी विविध मार्गांनी एकूण 4 कोटी 9 लाख 39 हजार रुपये देणगी प्राप्त झाली.

Back to top button