मांजरी : बेबी कॅनॉलमधून वाहते जलपर्णी ! नागरिकांचे आरोग्य धोक्यात | पुढारी

मांजरी : बेबी कॅनॉलमधून वाहते जलपर्णी ! नागरिकांचे आरोग्य धोक्यात

मांजरी; पुढारी वृत्तसेवा : साडेसतरानळी ते शेवाळेवाडी परिसरातून वाहणार्‍या बेबी कॅनॉलमध्ये जलपर्णी वाढली आहे. यामुळे परिसरातील रहिवाशांना दुर्गंधीसह डासांच्या त्रासाला तोंड द्यावे लागत आहे. प्रशासनाने कालव्यातील जलपर्णी तातडीने काढावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मुळा-मुठा नदीतील मुंढवा जॅकवेलमधून साडेसतरानळी येथून पुढे मांजरी, लक्ष्मी कॉलनी, शेवाळेवाडी व फुरसुंगी परिसरातील बेबी कॅनॉलमध्ये प्रक्रियाविना सांडपाणी सोडले जात आहे.

त्यामुळे कालव्यातील पाण्याची दुर्गंधी पसरली असून, परिसरात जलपर्णी बेसुमार वाढली आहे. त्यामध्ये कालव्यात कचरा मोठ्या प्रमाणात साचला आहे. तसेच, डासांचा उच्छाद वाढल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे महापालिका व पाटबंधारे विभागाने कालव्यातील जलपर्णी काढण्याची मागणी निवेदनाद्वारे प्रा. पोपटराव कामठे, प्रवीण चोरघडे, अक्षय घुले, अजित काळे आदींनी केली आहे.

अमरसृष्टी सोसायटीतील रहिवासी संदीप सिन्नरकर म्हणाले की, कालव्यात साचलेल्या जलपर्णीमुळे डासांची उत्पत्ती वाढली आहे. अनेक नागरिकांना डेंग्यू, मलेरियासारखे आजार झाले आहेत. त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिकेने परिसरात औषध फवारणी करून डासांची उत्पत्तिस्थाने नष्ट करावीत.

जलपर्णीबाबत नागरिकांच्या तक्रारी आलेल्या आहेत. यंत्रसामग्री उपलब्ध झाल्यावर जलपर्णी हटविण्याचे काम केले जाणार आहे. महापालिकेचीही त्यासाठी मदत मागितली आहे. त्यामुळे लवकरात लवकर हे काम सुरू करण्यात येईल.

                                            – सुभाष शिंदे, सहायक अभियंता, जलसंपदा विभाग

Back to top button