कोपरगाव : आत्मा मालिक ध्यानपीठात चैत्र महोत्सव | पुढारी

कोपरगाव : आत्मा मालिक ध्यानपीठात चैत्र महोत्सव

कोपरगाव; पुढारी वृत्तसेवा : परम पूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलीच्या पावन सानिध्यात व सकल आत्मा मालिक संतपीठाच्या उपस्थितीत दिनांक 1 ते 6 एप्रिल या कालावधीत कोकमठाण आश्रमामध्ये आत्मा मालिक ध्यारपीठात चैत्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवासाठी आत्मा मालिक ध्यान योग मिशनच्या वतीने तयारी पूर्ण झाली आहे. या कार्यक्रमास ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, मलेशिया तसेच देशभरातून हजारो भाविकांची उपस्थिती लक्षात घेता त्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.

मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. खर्‍या अर्थाने या वेळेसचा चैत्र महोत्सव म्हणजे विज्ञान, आरोग्य अध्यात्म किर्तन ध्यान व आत्मज्ञान याचा संगम असणारी एक महाकुंभमेळ्याची पर्वणीच आहे, अशी माहिती आत्मा मालिक ध्यान योग मिशनचे कार्याध्यक्ष संत परमानंद महाराज यानी पत्रकार परिषदेत दिली.

परमानंद महाराज म्हणाले, तीन वर्षाच्या खंडानंतर परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊली व सकल आत्मा मालिक संत पीठाच्या सानिध्यामध्ये या सहा दिवसीय महोत्सवाचे भव्यदिव्य आयोजन भक्तपरिवारासाठी करण्यात आले आहे. या महोत्सवा दरम्यान सहा दिवस सर्व भाविकांच्या सेवेसाठी आत्मज्ञानपर आधारीत विविध विषयावरील मार्गदर्शन तज्ञांची व्याख्याने संत महंतांची प्रवचने तसेच कीर्तन महोत्सव पूर्ण उत्सवा दरम्यान दररोज विविध आजारांवरील तपासणी व उपचारांचे मोफत शिविर आयोजित केले आहेत.

या दिव्य महातिथीचा अमृतयोग सकल भाविकांना अनुभवण्यास मिळावा म्हणून हे विशाल आयोजन काकड आरती, मौन ध्यान, भजन, प्रवचन, हरिपाठ, सत्संग, गुरुयाग व किर्तन महोत्सवासह महादिंडी सोहळ्याच्या माध्यमातून करण्यात येत आहे. दिनांक 1 एप्रिल रोजी पहाटे 5.30 वा आत्म पादुका पूजनाने या महोत्सवाची सुरुवात होणार आहे. सकाळी 10 ते 12 या वेळेत ज्या भाविकांनी 45 दिवसांचे उपवास केले आहेत अशा भाविकांचा अनुष्ठान विधी संत शांतीमाई यांचे करकमलाद्वारे संपन्न होणार आहे.

परमपूज्य सदगुरू आत्मा मालिक माऊली व सकल आत्मा मालिक सतपीठाच्या समवेत चैत्र शुद्ध चौदा दिनांक 5 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता ध्यान योग विद्यासंस्थान सत्संग हॉल मधून पायी भव्य दिव्य दिंडी सोहळ्यास अर्थात नगर प्रदिक्षणा सोहळ्यास सुरुवात होईल. या दिंडी सोहळ्याचे विसर्जन आत्मरूप ध्यान मंदिरामध्ये महाआरतीने होणार आहे.

याप्रसंगी बोलताना आत्मा मालिक ध्यान योग मिशनचे अध्यक्ष संत निजानंद महाराज यांनी सांगितले, चैत्र महोत्सवासाठी सत्संग व महाप्रसाद, मंडप व्यवस्था उभारण्यात आलेली आहे. सत्संग हॉल मध्ये अद्ययावत ध्वनिक्षेपण यंत्रणा एल. ई. डी. स्क्रिन लावण्यात आलेल्या आहेत. भाविकांच्या सोईसाठी आश्रमाच्या वतीने प्रसाद स्वागत दर्शन, वाहनतळ स्वच्छता, पाणीपुरवठा, आदि समित्यांचे गठण करण्यात आलेले आहे.

सहा दिवसीय या महोत्सवासाठी येणार्‍या भाविकांसाठी निवास व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच या महोत्सवाचे थेट प्रक्षेपण आता मालिक ध्यानपीठात ऑफिशीयल या यूट्यूब चॅनेलवरती केले जाणार आहे. महाप्रसादाची सर्व व्यवस्था व सेवा ही प्रसादालय समितीचे प्रमुख प्रकाश भट, बाळासाहेब गोरडे, प्रकाश गिरमे व त्याची संपूर्ण टीम संभाळणार आहे.

पत्रकार परिषदेच्या वेळी आत्मा मालिक ध्यान योग मिशनचे अध्यक्ष संत निजानंद महाराज, कार्याध्यक्ष संत परमानंद महाराज आत्मा मालिक ध्यान योग मिशनचे सदस्य संत विवेकानंद महाराज, सत चंद्रानंद महाराज, संत सत्पात्रानंद महाराज, संत साधनानंद महाराज, संत आनंद महाराज, संत राजनंद महाराज, संत जितेंद्रानंद महाराज संत किरणानंद महाराज, संत प्रेमानंद महाराज संत विजयानंद महाराज, संत योगानंद महाराज, संत पठारे महाराज, संत सेवादास महाराज, संत शेलार महाराज, संत सर्वेशानंद महाराज उपस्थित होते.

भाविकांसाठी मिष्टान्न भोजनाची व्यवस्था
उत्सवा दरम्यान चालू होणार्‍या अखंड अन्न छत्राबद्दल माहिती देताना विवेकानंद महाराज यांनी सांगितले की, प्रसादालय समितीच्या वतीने उत्सव काळात भाविकांसाठी अहोरात्र महाप्रसाद व्यवस्था सुरू राहणार आहे. भाविकांसाठी पंचपक्वान्नाचे भोजन देताना त्यामध्ये पुरी, चपाती, भाजी, वरणभात, मठ्ठा, जिलेबी, आमरस, श्रीखंड असे निरनिराळे मिष्टान्न दिले जाणार आहेत. तसेच पिण्यासाठी थंड आरओ पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Back to top button