कृषी यांत्रिकीकरणमध्ये कोपरगाव प्रथम : आ. आशुतोष काळे | पुढारी

कृषी यांत्रिकीकरणमध्ये कोपरगाव प्रथम : आ. आशुतोष काळे

कोळपेवाडी; पुढारी वृत्तसेवा : नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आधुनिक यंत्र सामुग्रीच्या मदतीने शेती करणे काळाची गरज आहे, परंतु सर्वच शेतकरी कृषी औजारे खरेदी करू शकत नाहीत. अशा गरजू शेतकर्‍यांसाठी शासनाकडून कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून अनुदान तत्वावर कृषी विभागाकडून कृषी औजारे देण्यात येतात, मात्र कृषी औजारांच्या शेतकर्‍यांच्या मागणी अर्जाची संख्या व मिळणारे अनुदान यामध्ये मोठी तफावत होती.

त्यामुळे गरजू शेतकर्‍यांना कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून ट्रॅक्टर व कृषी औजारांचा लाभ मिळवून द्या, अशा सूचना कृषी विभागाला केल्या होत्या. त्यानुसार कृषी विभागाने केलेल्या प्रामाणिक प्रयत्नातून कृषी यांत्रिकीकरण योजनेचा शेतकर्‍यांना लाभ मिळवून देण्यात कोपरगाव तालुका जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आला, अशी माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली. दरम्यान, त्यांनी कृषी विभागाचे कौतुक केले आहे.

कृषी विभागाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून लाभार्थी शेतकर्‍यांना आ. काळे यांच्या हस्ते 6.50 कोटीचे ट्रॅक्टर व कृषी औजारांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. आ. काळे म्हणाले, दिवसेंदिवस मजुरांची कमी होत आहे. कमी असलेले संख्याबळ व निसर्गाच्या लहरीपणामुळे कृषी यांत्रिकीकरणाला शेतकरी प्राधान्य देत आहेत. आज ती गरज झाली आहे.

त्यामुळे शेतकर्‍यांना आधुनिक यांत्रिकीकरणाच्या शेतीकडे वळणे भाग पडले, परंतु शेतमालाला खर्चाच्या तुलनेत अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे ‘दैव देते आणि कर्म नेते’ अशी अडचणींचा सामना करणार्‍या शेतकर्‍यांची परिस्थिती झाली आहे. वाढलेले कृषी औजारांचे दर सर्वसामान्य शेतकर्‍यांच्या अवाक्यात नाहीत. त्यामुळे गरजू शेतकर्‍यांसाठी निश्चितपणे कृषी यांत्रिकीकरण योजना फायदेशीर आहे, परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी कृषी विभागाकडे शेतकर्‍यांच्या अर्जांची संख्या व मिळणारे अनुदान यामध्ये मोठी तफावत आहे.

ही तफावत दूर करून कृषी औजारे मिळण्यासाठी अर्ज केलेल्या जास्तीत- जास्त शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ व्हावा, यासाठी कृषी विभागाने जबाबदार भूमिका पार पाडली. यामुळे कृषी यांत्रिकीकरण योजनेतून 6.50 कोटीचे ट्रॅक्टर व कृषी औजारे शेतकर्‍यांना मिळाल्याचे आ. काळे म्हणाले.

यावेळी तहसीलदार विजय बोरुडे, गटविकास अधिकारी सचीन सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, गोदावरी खोरेचे संचालक दिलीप शिंदे, नंदकुमार औताडे, प्रभाकर गुंजाळ, विठ्ठल जावळे, गणेश बारहाते, राजेंद्र औताडे, युवराज गांगवे, बाळासाहेब औताडे, भाऊसाहेब औताडे, बाजीराव होन, दत्तात्रय गांगवे, भारत रानोडे, नितीन पगार आदींसह लाभार्थी शेतकर्‍यांसह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

कृषी यांत्रिकरण योजनेंतर्गत ट्रॅक्टर व ट्रॅक्टर चलित औजारांसाठी मोठी मागणी आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर लकी ड्रॉद्वारे निवड होत शेतकर्‍यांना अनुदान दिले जाते. सन 2022-23 वर्षात कृषी विभागामार्फत सर्वाधिक कृषी यंत्र औजारे वाटण्यात आली. आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनातून कोपरगाव तालुका जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे.
                             – मनोज सोनवणे (तालुका कृषी अधिकारी)

Back to top button