केकेआरचा नवा कर्णधार नितीश राणा | पुढारी

केकेआरचा नवा कर्णधार नितीश राणा

कोलकाता, वृत्तसंस्था : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2023) सुरू होण्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सने सोमवारी मोठी घोषणा केली. फ्रँचायझीने श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत 29 वर्षीय नितीश राणाकडे केकेआर संघाचे कर्णधारपद सोपवले आहे. अय्यर सध्या पाठीच्या दुखापतीशी झुंज देत आहे आणि संपूर्ण आयपीएल हंगामातून तो बाहेर पडण्याची शक्यता आहे. केकेआरचा पहिला सामना 1 एप्रिल रोजी पंजाब किंग्ज विरुद्ध रंगणार आहे.

श्रेयस अय्यर आयपीएल 2023 मधील काही सामन्यांसाठी नक्कीच उपलब्ध असेल, अशी आशा केकेआरने व्यक्त केली आहे. आपल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, ‘नितीशला टी-20 क्रिकेटमध्ये आपल्या राज्याचे कर्णधारपद भूषवण्याचा अनुभव आहे. त्या द़ृष्टीने आम्ही भाग्यवान आहोत. तो 2018 पासून केकेआरशी जोडला गेला आहे, आशा आहे की तो चांगली कामगिरी करेल.’

‘आम्हाला विश्वास आहे की, मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित आणि सपोर्ट स्टाफच्या नेतृत्वाखाली नितीशला सर्व सहकार्य मिळेल. यासोबतच त्याला संघातील अनुभवी खेळाडू पूर्ण पाठिंबा देतील. नितीशला आम्ही त्याच्या नवीन भूमिकेसाठी आणि श्रेयसला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देतो,’ अशी भावनाही केकेआरने व्यक्त केली आहे.

शार्दुल, नरेन यांना मागे टाकले

कर्णधारपदासाठी नितीशची शार्दुल ठाकूर आणि सुनील नरेन यांच्यात शर्यत होती. नरेन 2012 पासून केकेआरकडून खेळत आहे. त्याने अलीकडेच आयएलटी-20 च्या उद्घाटन आवृत्तीत अबुधाबी नाईट रायडर्सचे नेतृत्व केले. जिथे सहा संघांच्या स्पर्धेत अबुधाबी नाईट रायडर्स हा संघ एक विजय आणि आठ पराभवांसह शेवटच्या स्थानावर राहिला.

Back to top button