कोल्हापूर: पन्हाळा येथील ‘शाश्वत पर्यावरण विकास’ राष्ट्रीय परिषदेत १५० संशोधक सहभागी | पुढारी

कोल्हापूर: पन्हाळा येथील 'शाश्वत पर्यावरण विकास' राष्ट्रीय परिषदेत १५० संशोधक सहभागी

पन्हाळा; पुढारी वृत्तसेवा : जागतिक तापमान वाढीचा धोका लक्षात घेता पर्यावरण रक्षणासाठी शाश्वत विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून विचार मंथन होणे गरजेचे आहे. परिषदांमधून होणारे विचारमंथन समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचल्यास पर्यावरण रक्षणाची चळवळ उभी राहील, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ. पी. एस. राऊत यांनी केले.

पन्हाळा येथील सांस्कृतिक सभागृहात आजपासून चिखली (ता. शिराळा) येथील देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक महाविद्यालयामार्फत आंतरविद्याशाखीय ‘शाश्वत पर्यावरण विकास’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटना प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी विश्वास शिक्षण प्रसारक मंडळ चिखली (ता. शिराळा) या संस्थाचे सचिव बाबासाहेब पवार हे होते.

प्रस्ताविक प्राचार्य डॉ. एस. आर. पाटील यांनी तर पाहुण्यांची ओळख परिषदेच्या समन्वयक डॉ. रेखा देवकर यांनी केले. डॉ. राऊत पुढे म्हणाले, जागतिक पातळीवरचा विचार करता कार्बन उत्सर्जन आणि तापमान वाढ याने अख्या जगाला ग्रासले आहे. वेळीच आपण या सर्व गोष्टीचा गांभीर्याने विचार केला नाही. तर येणाऱ्या पिढ्या आपणाला माफ करणार नाहीत. म्हणूनच वैश्विक विचार करताना सुरुवात मात्र आपल्यापासून केली पाहिजे.

आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना बाबासाहेब पवार म्हणाले, आपण साध्या गोष्टी पासून पर्यावरण रक्षणाचा विचार करायला हवा. साध्या कृतीतूनच आपण व्यापक अंमलबजावणी करू शकतो. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या मार्फत समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजे. तरच आपण येणाऱ्या पिढ्यांना काहीतरी शाश्वत देऊ शकू.

या कार्यक्रमास भूषण नाईक हे प्रमुख उपस्थित होते. परिषदेसाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून मध्यप्रदेश येथील दिनेश कानडे, भोपाळ येथील डॉ.जया शर्मा, गोवा विद्यापीठाचे माजी विभाग प्रमुख डॉ.आनंद पाटील यांच्यासह देशातील सुमारे १५० संशोधक, प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. नीता जोखे व डॉ. मांतेश हिरेमठ यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी सह समन्वयक डॉ. अभिजित शिंदे, डॉ. विनायक सुतार उपस्थित होते. डॉ. शुभांगी कांबळे यांनी आभार मानले.

हेही वाचा 

Back to top button