कोल्हापूर : उदगाव सरपंचावर अविश्वास ठराव मंजूर; काँग्रेस, शिवसेना, यड्रावकर गटाला धक्का | पुढारी

कोल्हापूर : उदगाव सरपंचावर अविश्वास ठराव मंजूर; काँग्रेस, शिवसेना, यड्रावकर गटाला धक्का

जयसिंगपूर; पुढारी वृत्तसेवा : उदगाव (ता. शिरोळ) येथील सरपंच कलीमुन बाळासो नदाफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे व मनमानी कारभाराचे आरोप करत स्वाभिमानीच्या सदस्यानी तहसीलदार यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला होता. यासाठी शुक्रवारी विशेष सभा घेण्यात आली. यात स्वाभिमानीच्या ९ सदस्यासोबत काँग्रेस, शिवसेना व आमदार यड्रावकर गटाच्या ५ सदस्यानी अविश्वास ठरावाला पाठिंबा दिल्याने १४ विरुद्ध २ ने सरपंच नदाफ यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. अध्यक्षास्थानी तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ होत्या. दरम्यान, सरपंच यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर होतात स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्याने जल्लोष केला.

उदगांव ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत स्वाभिमानीला ९ तर विरोधी काँग्रेस, शिवसेना, यड्रावकर गट आघाडीला यांना ८ जागा मिळाल्या होत्या. यात कलीमुन नदाफ या स्वाभिमानीकडून निवडून आल्या होत्या. तर कलीमुन नदाफ यांना विरोधी आघाडीने फोडून त्यांना सरपंच केले होते. त्यामुळे स्वाभिमानीची हातात आलेली सत्ता हिसकावून घेतली होती. तर त्यानंतर विरोधी आघाडीतील हिदायत नदाफ यांना उपसरपंच केले होते. मात्र, सरपंच यांच्या मनमानी कारभारामुळे उपसरपंच हिदायत नदाफ यांनी राजीनामा देऊन स्वाभिमानीला पाठींबा दिला होता. त्यानंतर स्वाभिमानीचे रमेश मगदूम याना उपसरपंच केले होते. दरम्यान सरपंच यांचा मनमानी कारभार व भष्ट्राचाराचे आरोप करून तक्रारी दाखल केल्या होत्या.

स्वाभिमानीच्या ९ सदस्यांनी राजीनामे देऊन सरपंच यांच्याविरोधात पुन्हा तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यानंतर ९ सदस्यांनी राजीनाम्यावर हरकती घेऊन तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांच्याकडे १७ मार्च रोजी सरपंच नदाफ यांच्याविरोधात अविश्वास दाखल केला होता. त्यानंतर तहसीलदार यांनी शुक्रवारी विशेष सभा बोलावली होती. यात आघाडीचे सदस्य दिलीप कांबळे हे गैरहजर होते. तर सरपंच यांच्या ठरावविरुद्ध नदाफ व सदस्य दीपिका कोळी यांची २ मते मिळाली.

तर ठरावाच्या बाजूने स्वाभिमानीचे उपसरपंच सौरभ पाटील ग्रामपंचायत सदस्य हिदायत नदाफ, मेघराज वरेकर, जगनाथ पुजारी, रमेश मगदूम, सुनीता चौगुले, पूजा जाधव, भारती मगदूम, जोत्स्ना गदगडे तर विरोधी आघाडीचे सदस्य अरुण कोळी, सलीम पेंढारी, सावित्री मगदूम, सुवर्णा सुतार, रुक्मिणी कांबळे यांची १४ मते मिळाल्याने सरपंच नदाफ यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर झाला. प्रशासकीय काम ग्रामविकास अधिकारी डी.आर. कांबळे यांनी पाहिले. यावेळी स्वाभिमानीचे नेते सावकर मादनाईक, प्रा. राजाराम वरेकर, प्रकाश बंडगर, विजय कर्वे, भरत पाटील, बंडेश साखळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जल्लोष केला.

स्वाभिमानीने काढला वाचपा

पंचवार्षिक निवडणूकीत उदगाव ग्रामपंचायतमध्ये स्वाभिमानीची सत्ता आली होती. मात्र, विरोधाकांनी स्वाभिमानीच्या सदस्या कलीमुन नदाफ यांना फोडून सरपंच केले होते. त्यामुळे स्वाभिमानीला हातची सत्ता गमवावी लागली होती. त्यानंतर स्वाभिमानीने गावातील सोसायटीची सत्ता मिळविली. शिवाय आता सरपंच यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर झाल्याने ग्रामपंचायतीची सत्ता हिसकावून घेवून वचपा काढल्याने काँग्रेस, शिवसेना, यड्रावकर गटाच्या आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

हेही वाचा : 

Back to top button