पुणे : महिलांसह लहान मुलांची पाण्यासाठी भटकंती | पुढारी

पुणे : महिलांसह लहान मुलांची पाण्यासाठी भटकंती

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा :  सिंहगड भागातील खामगाव मावळ, मोगरवाडी परिसरातील वाड्या-वस्त्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. मात्र या योजनेच्या अपूर्ण कामांमुळे मोगरवाडी (ता. हवेली) येथील जानकर व कोकरेवस्ती पाण्यापासून वंचित राहिल्या आहेत. त्यामुळे येथील महिलांसह लहान मुलांना पाण्यासाठी दूरदूर भटकंती करावी लागत आहे. या संदर्भात स्थानिक कार्यकर्ते दिनकर जानकर यांच्यासह रहिवाशांनी जिल्हा परिषदेचे लक्ष वेधले आहे. जानकर म्हणाले, जानकर व कोकरे वस्त्यांमध्ये पाण्याची सोय नाही. बाराही महिने दूर अंतरावरून पायपीट करून महिलांसह लहान मुलांना डोक्यावर हंडे भरून पाणी आणावे लागत आहे. दरम्यान, राष्ट्रीय पेजल योजनेतून या वस्त्यांना पाणीपुरवठा करण्यात येणार होता. मात्र, त्यासाठी जलवाहिनी अद्याप टाकण्यात आलेल्या नाहीत.

याशिवाय दुरुपदरा येथे पाण्याची टाकी बांधली, पण त्यात पाणी सोडले जात नाही. असे असताना योजना पूर्ण झाली असे पत्र जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने ग्रामपंचायतीला दिले आहे. त्यामुळे आता ऐन उन्हाळ्यात डोंगरावरून चढ-उतार करत रहिवाशांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तातडीने या योजनेचे राहिलेले काम पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे. तर याबाबत पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधला असता सुधारित पाणीपुरवठा योजनेतून उर्वरित वाड्या-वस्त्यांत पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

अनेक महिन्यांपासून रखडलेल्या पाणी योजनेचे काम कसेबसे पूर्ण झाले आहे. टंचाईग्रस्त खामगाव मावळ व वाड्यातील पाण्याची समस्या दूर झाली आहे. मात्र, जानकर व कोकरे वस्त्यांत पाण्याअभावी टंचाईची समस्या कायम आहे.
         -किसनराव जोरी, माजी उपसभापती, हवेली तालुका पंचायत समिती

 

Back to top button