संगमनेर : 7 दिवसांत 36 हजार महिलांचा बसने प्रवास | पुढारी

संगमनेर : 7 दिवसांत 36 हजार महिलांचा बसने प्रवास

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा च्या एसटी बसमध्ये प्रवास करताना महिलांना प्रवास भाड्यात 50 टक्के सवलतीची योजना सुरू केली आहे. या योजनेच्या अंतर्गत संगमनेर आगारातून अवघ्या 7 दिवसात 35 ते 36 हजार महिलांनी एसटी बसने प्रवास केला आहे. योजना सुरू झाल्यानंतर आता एसटीने प्रवास करण्याकडे महिलांचा कल जास्तीत जास्त वाढलेला दिसून येत आहे.
संगमनेर आगारात एकूण 58 एस टी बस दाखल झालेल्या आहेत. त्यात 9 निमआराम, 2 विठाई, 2 शिवशाही, साध्या 45 एसटी बसेस उपलब्ध असून त्या बसच्या माध्यमातून दररोज 320 फेर्‍या होत आहे.

त्यात दीर्घ, मध्यम व ग्रामीण अशा तीन स्तरिय बससेवेचा समावेश करण्यात आला आहे. दीर्घ पल्ल्याच्या प्रवासात मुंबई, सातारा कोल्हापूर, गोंदवले, पंढरपूर, सोलापूर, सांगली, मध्यम पल्ल्याच्या प्रवासामध्ये छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, बारामती, बीड, नगर या सारख्या शहरांचा तर ग्रामीण फेर्‍यांमध्ये संगमनेर, अकोले तालुक्यातील विविध गावांचा समावेश केला आहे.

महाराष्ट्रातील शिंदे- फडणवीस सरकारने महिलांना एसटी बसमध्ये प्रवासात 50 टक्के सवलत देण्याची योजना सुरू केली आहे. त्यामुळे आता एसटीने प्रवास करण्याकडे महिलांचा जास्त ओढा वाढू लागला आहे. त्यामुळे संगमनेर आगारातून जाणार्‍या पुणे, नगर, नाशिक, पंढरपूर, बीड, बारामती, छत्रपती संभाजीनगर या एस टी बस गाड्यांमध्ये 12 वर्षांपासून ते 75 वर्षांपासून अर्धे तिकीटात प्रवास करण्यासाठी सवलत देण्यात आलेली आहे. तसेच 75 च्या पुढे वृद्ध महिलांना फ्री सवलत देण्यात येत आहे. संगमनेर आगारामध्ये या योज नेला 17 मार्च पासून सात दिवसात 35 ते 36 हजार महिलांनी बसने प्रवास केला.

संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेकजण नोकरीच्या निमित्त पुणे, मुंबई सारख्या मोठ्या शहरात नोकरीला आहेत. सध्या तालुक्याच्या ग्रामीण भागातील गावोगावाच्या यात्रा सुरू झाल्या अस ल्यामुळे गावी येणार्‍यांमध्ये महिलांचे प्रमाण जास्त राहणार आहे.
त्यामुळे महिलांचे एसटी बसने प्रवास करण्याचे प्रमाण वाढणार असून या योजनेला निश्चितच गती मिळणार आहे, असे चित्र आहे. या योजनेमुळे महिलाही खुश आहेत.

उन्हाळ्यात गर्दी वाढणार
सध्याचा कालावधी परीक्षांचा आहे. त्यामुळे बसस्थानकावरील प्रवाशांची गर्दी नियमित आहे. मात्र परीक्षांचा काळ संपल्यानंतर उन्हाळ्याची सुट्टी सुरू होणार आहे. त्यामुळे प्रवाशांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढेल, असा अंदाज आहे. त्यात महिलांची संख्या लक्षणीय असेल. प्रवाशांच्या सेवेसाठी आणि सुरक्षित प्रवासासाठी संगमनेर आगार प्रयत्नशील राहणार असल्याचे संगमनेर आगाराचे व्यवस्थापक मयुर पाटील यांनी दैनिक ‘पुढारी’ शी बोलताना सांगितले.

Back to top button