पुणे: बालविवाह रोखण्यात वानवडी पोलिसांना यश | पुढारी

पुणे: बालविवाह रोखण्यात वानवडी पोलिसांना यश

वानवडी (पुणे), पुढारी वृत्तसेवा: जागृत नागरिकांमुळे व बालन्याय मंडळ आणि वानवडी पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे एका चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात यश मिळाले आहे.

गुरुवारी सकाळी बालन्याय मंडळच्या माजी सदस्य मनीषा पगडे यांनी दूरध्वनीद्वारे बाल कल्याण समिती, पुणे भाग एकच्या अध्यक्षा व सदस्य यांना वानवडी भागातील एक अल्पवयीन बालिकेचा बाल विवाह होणार असल्याची माहिती दिली. या बरोबरच बालिकेचा जन्म दाखला प्राप्त झाल्यामुळे बालिका अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. तातडीने अध्यक्षा डॉ. राणी खेडीकर व सदस्य आनंद शिंदे, ॲड. पूर्वी जाधव, वैशाली गायकवाड व शामलता राव यांनी वानवडी पोलिस स्टेशनशी संपर्क साधून बाल विवाहाची माहिती दिली. त्यानुसार वानवडी पोलिस स्टेशनने त्वरित बालिकेस ताब्यात घेतले.

व्हिडिओ कॉलव्दारे अध्यक्षा व सदस्य यांनी बालिकाच्या आजी आणि काका यांच्याशी संवाद साधला. बालिकेच्या आईचे ती एक वर्षाची असतानाच निधन झाले असून, तिच्या वडिलांना फिट्स येतात. बालिकेची आजी भिक्षा मागून बालिकेचा सांभाळ करत आहे. बालिकेचा विवाह एका दोन मुले असणाऱ्या पुरुषाशी ठरवण्यात आला होता, अशी माहिती देखील प्राप्त मिळाली होती. अशा परिस्थितीत बालिका ही काळजी व संरक्षण अंतर्गत येत असल्यामुळे बाल कल्याण समिती अध्यक्ष डॉ. राणी खेडीकर, सदस्य आनंद शिंदे, वैशाली गायकवाड, श्यामलाता राव आणि पूर्वी जाधव यांनी चर्चा करून बालिकेला एका संस्थेत सुरक्षित ठेवले आहे. बालिकेचे पुनर्वसन हेतू ठोस निर्णय समिती कडून घेतले जातील अशी ही माहिती देण्यात आली आहे. मनीषा पगडे, बाल कल्याण समिती पुणे भाग एक आणि वानवडी पोलिस स्टेशन यांच्या तत्परतेने हा बाल विवाह थांबवण्यात यश मिळालं. भविष्यात बालविवाह रोखण्यासाठी बालकल्याण समितीशी संपर्क करा, असे आवाहन बालकल्याण समिती सदस्य आनंद शिंदे यांनी केले आहे.

Back to top button