पिंपरी : गुढीपाडव्यानिमित खरेदीची लगबग | पुढारी

पिंपरी : गुढीपाडव्यानिमित खरेदीची लगबग

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : गुढीपाडवा सण बुधवारी (दि. 22) घरोघरी गुढ्या उभारून साजरा केला जाणार आहे. सणानिमित्त पूजा साहित्य आणि फुलांची खरेदी करण्यासाठी मंगळवारी नागरिकांनी शहरातील विविध बाजारपेठांमध्ये गर्दी केली होती. साखरगाठी, हापूस आंबे, गुढी उभारण्यासाठी लागणारे साहित्य आदींची खरेदीसाठी महिला वर्गाची लगबग सुरू होती. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्याने या मुहूर्तावर सोने, घर, वाहन खरेदी केली जाते. तसेच, नवीन उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठीदेखील व्यावसायिकांकडून बुधवारचा मुहूर्त साधला जाणार आहे.

हिंदू धर्मात गुढीपाडवा या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाची कोवळी पाने व फुले खाऊन दिवसाची सुरुवात केली जाते; तसेच घराच्या मुख्य दारावर आंब्याच्या पानांचे तोरण लावले जाते. त्यानंतर घराबाहेर सुंदर गुढी उभारली जाते. गुढीसमोर आणि दारासमोर आकर्षक रांगोळी काढली जाते. गुढीची मनोभावे पूजा करुन सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात.

गुढीपाडव्यासाठी शहरात उत्साह पाहण्यास मिळत आहे. सणानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांमध्ये शोभायात्रा काढण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे, सणानिमित्त नवीन कपडे, पुजा साहित्य, साखरगाठी, हापुस आंबे, फुल्यांच्या खरेदीसाठी पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी अशा शहरातील विविध भागांतील बाजारपेठांमध्ये नागरिकांनी गर्दी केली होती.

 बाजारात फुलांची आवक वाढली

गुढीपाडव्यानिमित्त पिंपरी येथील फूल बाजारात एरवीपेक्षा फुलांची आवक तिपटीने वाढली आहे. दररोज दहा टनांची होणारी आवक सोमवार आणि मंगळवारी पस्तीस ते चाळीस टन झाली.
बाजारात झेंडू, गुलछडी, शेवंती, अ‍ॅस्टर व गुलाब आदी फुलांना अधिक मागणी होती. या फुलांची आवक तिपटीने वाढली असून, दरातही तीस ते पन्नास टक्क्यांची वाढ झाली आहे. हार बनविताना वापरल्या जाणार्‍या तुळजापुरीचे उत्पन्न उन्हामुळे कमी झाल्याने आवक घटली होती. पाकली, सकाला, जरबेरा आदींनाही मागणी आहे.
पिंपरी बाजारात खेड, मोशी मावळ आदी तालुक्यांमधून फुलांची आवक होत असल्याची माहिती फूल बाजार समितीचे अध्यक्ष राजकुमार मोरे यांनी दिली.

बाजारात या फुलांना मागणी व त्यांचे दर
फूल ः दर (प्रतिकिलो)
झेंडू (पिवळा) ः 70 ते 80
झेंडू (लाल) : 50 ते 60
गुलछडी ः 300
शेवंती ः 40
गुलाब (पाकळी) : 400
गुलाब (गुच्छ) ः 150 ते 200

Back to top button