संसदेतील कोंडी कायम, गदारोळामुळे कामकाज ठप्प | पुढारी

संसदेतील कोंडी कायम, गदारोळामुळे कामकाज ठप्प

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : विरोधकांबरोबरच सत्ताधाऱ्यांनी उभय सदनात घातलेल्या गदारोळामुळे संसदेचे मंगळवारचे कामकाज पूर्णपणे वाया गेले. अदानीच्या मुद्द्यावर संयुक्त संसदीय समिती स्थापन करावी, या मागणीसाठी काँग्रेससह अन्य विरोधी पक्ष आक्रमक आहेत तर विदेशात जाऊन केलेल्या वक्तव्याबद्दल राहुल गांधी यांनी माफी मागावी, यासाठी सत्ताधारी भाजप खासदारांनी संसद डोक्यावर घेतलेली आहे.

लोकसभेत सकाळी अकरा वाजता कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी वारंवार समजावून सुद्धा गोंधळ थांबला नाही. यामुळे बिर्ला यांनी कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केले. संसदेतला तिढा सोडवण्यासाठी बिर्ला यांनी दुपारी एक वाजता सर्व पक्षाच्या नेत्यांची बैठकही घेतली होती. तिकडे राज्यसभेतील कोंडी फोडण्यासाठी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी सर्व पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. मात्र बहुतांश विरोधी पक्षांनी या बैठकीकडे पाठ फिरवली.

दरम्यान अदानी प्रकरणावरून विरोधी खासदारांनी संसद प्रांगणात जोरदार घोषणाबाजी केली, तसेच सरकारच्या विरोधात पोस्टर्स आणि बॅनर दाखविले. विशेष म्हणजे तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी विरोधी गोटात न मिसळता स्वतंत्रपणे आंदोलन केले. अदानी प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडावे, असे तृणमूल काँग्रेसकडून सांगण्यात आले. तत्पूर्वी सकाळी विरोधी पक्षांनी बैठक घेत जेपीसीच्या मुद्द्यावर तडजोड न करण्याचा निर्णय घेतला. बैठकीस काँग्रेस, द्रमुक, राजद, माकप, भाकप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (युबीटी), संयुक्त जद, झारखंड मुक्ती मोर्चा, आययुएमएल, आप, एमडीएमके आदी पक्षांचे नेते उपस्थित होते.

गदारोळात दोन विधेयके मंजूर

सकाळच्या सत्राप्रमाणे दुपारचे सत्र सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे वाया गेले. गोंधळातच सरकारकडून जम्मू काश्मीर एप्रोप्रिप्रेशन विधेयक आणि आणखी एक विधेयक मंजूर करण्यात आले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या आठवड्याचे कामकाज वाया गेले होते. आता दुसरा आठवडासुध्दा गोंधळामुळे कोरडा जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

           हेही वाचलंत का ?

Back to top button