राहुल गांधी हे देशाच्या राजकारणातले मीर जाफर : भाजप प्रवक्ते संबीत पात्रा यांचा टोला | पुढारी

राहुल गांधी हे देशाच्या राजकारणातले मीर जाफर : भाजप प्रवक्ते संबीत पात्रा यांचा टोला

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा :  विदेशात जाऊन भारताची बदनामी केलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी माफी मागितल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही, असे सांगतानाच गांधी हे देशाच्या विद्यमान राजकारणातले मीर जाफर असल्याची टीका भाजप प्रवक्ते संबीत पात्रा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.
राहुल गांधी यांनी ब्रिटनमध्ये केलेल्या वक्तव्याचे पडसाद अजूनही उमटत असून संसदेचे कामकाज देखील या मुद्द्यावरून प्रभावित झालेले आहे. राहुल गांधी हे सातत्याने देशाला बदनाम करीत आहेत. आजच्या राजकारणातले ते मीर जफर आहेत. देशाच्या अंतर्गत बाबतीत विदेशी शक्तींनी हस्तक्षेप करावा, असे गांधी उघडपणे सांगतात. काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी देशाविरोधात कट रचलेला आहे. गांधी हे संसदेच्या कामकाजात कमी सहभाग घेतात आणि त्याचवेळी संसदेत बोलू दिले जात नाही, अशी दुटप्पी भूमिका घेतात, असे पात्रा म्हणाले.
गांधी यांना राफेल प्रकरणात माफी मागावी लागली होती आणि आतासुध्दा त्यांना माफी मागावी लागेल, असे सांगून पात्रा म्हणाले की, देशाला बदनाम करण्याचे काम मणिशंकर अय्यर आणि राहुल गांधी करत आहेत. राहुल गांधी यांनी राज्यघटना व पाकिस्तानच्या आयएसआय संघटनेत समानता असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसच्या शहजाद्याला आता नवाब बनायचे आहे, असा टोलाही पात्रा यांनी मारला.

Back to top button