

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : पन्नास खोके माजलेत बोके… पन्नास खोके, एकदम ओके.. दादा भुसे मुर्दाबाद… अशा घोषणा देत राष्ट्रवादी आणि घटक पक्षांच्या आमदारांनी वेलमध्ये उतरत आज (दि.२१) जोरदार आंदोलन केले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी आक्षेपार्ह विधान केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सभागृहात आक्रमक झाले आणि वेलमध्ये उतरत जोरदार घोषणाबाजी केली.
खासदार संजय राऊत यांच्या ट्वीटवर बोलताना दादा भुसे यांनी संजय राऊत हे मातोश्रीची भाकरी खातात आणि शरद पवाराच्या घरची चाकरी करतात, असे आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आक्रमक झाले. दरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दादा भुसे यांनी शरद पवार यांचे नाव घेण्याची आवश्यकता नव्हती. तुम्ही दिलगिरी व्यक्त करा, अशी मागणी केली.
दादा भुसे यांनी वक्तव्य केले, ते माध्यमांपर्यत गेले आहे. त्यामुळे तुम्ही रुलिंग लवकर द्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अध्यक्षांकडे केली. दरम्यान, शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले असेल तर, ते रेकॉर्डवरुन काढण्यात येईल, असे आश्वासन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.
हेही वाचा