चंद्रपूर: बेताल वक्तव्याप्रकरणी संजय गायकवाड यांचा शासकीय कर्मचाऱ्यांकडून निषेध | पुढारी

चंद्रपूर: बेताल वक्तव्याप्रकरणी संजय गायकवाड यांचा शासकीय कर्मचाऱ्यांकडून निषेध

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा: राज्यात शासकीय, निमशासकीय, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी १४ मार्चपासून संपावर असताना आमदार संजय गायकवाड यांनी राज्यातील ८० टक्के कर्मचारी भ्रष्ट असल्याचे वक्तव्य केले. त्यामुळे राजूरा येथील तहसील कार्यालय परिसरात संतापलेल्या आंदोलकांनी आमदार संजय गाकवाड यांच्या पुतळ्याचे दहन करून निषेध केला. व सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

राजूरा तालुक्यातील सर्व विभागातील कर्मचारी १४ मार्चपासून संपावर होते. सात दिवसांपासून तहसील परिसरात कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनात सर्वच विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले असल्यामुळे शासकीय कार्यालय ओस पडलेले पाहायला मिळाले. सर्वसामान्यांची कामे ठप्प झालेली आहेत. जुनी पेन्शन तथा इतर मागण्यांकरिता पुकारलेला हा लढा मागण्या पूर्ण होईपर्यंत असाच सुरू राहील, असा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.

तर दुसरीकडे आमदार संजय गायकवाड यांनी ८० टक्के कर्मचारी भ्रष्ट असल्याचे बेताल वक्तव्य केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला. तहसील कार्यालय परिसरात आमदार गायकवाड यांच्या पतळ्याचे दहन करून जाहीर निषेध करण्यात आला. तसेच कर्मचाऱ्यांविरोधात अभद्र बोलणाऱ्या आमदारांना धडा शिकवण्यात येईल, असा निर्धार कर्मचारी संघटनांनी केला.

यावेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे, जुन्या पेन्शन हक्क संघटनेचे अध्यक्ष राजू डाहुले, पुरोगामी शिक्षक समितीचे अध्यक्ष संदिप कोंडेकर, प्रदीप पायघन, किरण लांडे ,हंसराज शेंडे, आरोग्य विभाग संघटनेचे पी. आय. कामडी, सुरेश खाडे, महसूल विभागाचे रंजीता कोहपरे, वनविभागाचे संतोष कुकडे, अमोल बदखल, पंकज गावडे, अविनाश पिंपळशेंडे, सुधीर झाडे, दीपक भोपळे, श्रीकांत भोयर यांच्यासह शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते.

हेही वाचा 

Back to top button