चंद्रपूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस; वीज पडून महिला जखमी | पुढारी

चंद्रपूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस; वीज पडून महिला जखमी

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्ह्यात दोन दिवसांपासून सर्वत्र ढगाळ वातावरण असताना आज शनिवारी (दि. १८) सकाळपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना फटका बसला आहे. तर सिंदेवाही तालुक्यातील आंबोली येथे शेतात वीज पडून एक महिला जखमी झाली आहे.

मार्च महिना सुरू होताच कडक उन्ह तापायला सुरुवात झाली होती. मात्र, मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले. उन्हाचा पारा वाढला असताना ढगाळ वातावरणामुळे वातावरणात गारवा जाणूव लागला. आज शनिवारी (दि. १८) सकाळच्या सुमारास जिल्हयात पावसाच्या सरी कोसळल्या. चंद्रपूरसह भद्रावती, वरोरा, सिंदेवाही, ब्रम्हपुरी, बल्लारपूर, नागभीड आदी तालुक्यात पावसाच्या पावसाच्या सरी कोसळल्या. सिंदेवाही तालुक्यात आंबोली येथे शेतात काम करीत असलेल्या गिता निळकंठ लोखंडे (वय ३५) या महिलेवर शनिवारी ११.३० वाजताच्या सुमारास वीज पडली. यात ती जखमी झाली. तिला सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या अवकाळी पावसाने कापूस, गहू, हरभरा यासह शेतातील भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात २१ मार्चपर्यंत ‘येलो अलर्ट’

भारतीय हवामान खात्याने चंद्रपूर जिल्ह्यात 21 मार्चपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व जिल्ह्यातील एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, वादळी वारा (वेग 30 ते 40 किमी. प्रति तास) तसेच गारा पडण्याची शक्यता वर्तविली आहे. 19 ते 21 मार्च या कालावधीकरिता ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. शेतकर्‍यांनी पिकांची काळजी घ्यावी, वीज गर्जना होताना घरातच राहावे, शेतात भ्रमणध्वनी वापरु नये, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

Back to top button