अक्षयधारा.. शहरात अवकाळीचा धुमाकूळ; 15 मेपर्यंत शहरात पावसाचा अंदाज

अक्षयधारा.. शहरात अवकाळीचा धुमाकूळ; 15 मेपर्यंत शहरात पावसाचा अंदाज
पुणे : पुढारी वृत्तसेवा : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शुक्रवारी (दि.10) दुपारी पुणे शहरावर जणू अक्षयधाराच बरसल्या. तासाभरात शहरात विक्रमी पावसाची नोंद झाली. लोहगावात हंगामातील सर्वाधिक 58 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. शहर आणि परिसराला अवकाळी पावसाने अक्षरश: झोडपून काढले. विजांचा कडकडाट, वादळी वार्‍यांनी शहराचे चित्रच बदलून टाकले. त्यानंतर सर्वत्र जोरदार पावसाने दाणादाण उडवून दिली. अनेक वाहनांवर झाडे पडल्याने मोठे नुकसान झाले. स्वारगेट बसस्थानकाला जणू तलावासारखे स्वरूप आले होते. या पावसाने नागरिकांसह बाहेरून आलेल्या प्रवाशांची अक्षरश: तारांबळ उडाली. अग्निशमन दलाचे फोन दुपारपासून रात्रीपर्यंत खणखणत होते.
शुक्रवारी दुपारी 3 वाजून 20 मिनिटांनी आकाशात ढगांनी गर्दी केली. त्यानंतर सुमारे तासभर वादळीवारे  आणि विजांच्या कडकडाटासह पडलेल्या पावसाने नागरिकांची दाणादाण उडाली. शहराच्या सर्वच भागात रस्त्यावर गुडघाभर पाणी वाहत होते. झाडपडीमुळे वाहनांचे नुकसान झाल्याच्या घटनादेखील घडल्या असल्याचे दिसून आले. तसेच  मुंढवा, केशवनगर, वानवडी, सहकारनगर, अरण्येश्वर, बिबवेवाडी, कात्रज, सांगवी, पिंपरी-चिंचवड, वडगाव शेरी, चंदननगर, एम.जी.रोड या भागातील वीजपुरवठा काही काळ खंडित झाला होता.

अग्निशमनदलाची  प्रचंड धावपळ

रस्त्यावर सर्वत्र सखल भागात गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे अनेक भागांतील वाहतूक विस्कळीत झाली. पर्वती, कात्रज रस्ता, शिवाजीनगर, स्वारगेट बसस्थानक, कोथरूड, सेनापती बापट मार्ग, विद्यापीठ रस्ता, पाषाण, बाणेर, औंध या भागात वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाने रस्त्यावर पावसाचे पाणी, झाडांच्या फांद्या, पालापाचोळा, काढताना अग्निशमन दलाच्या जवानांची दमछाक झाली. अनेक ठिकाणी वाहनांवर झाडे पडली. त्यात कार, रिक्षा आणि दुचाकींचे नुकसान झाल्याचा घटना घडल्या.

15 मेपर्यंत शहरात पावसाचा अंदाज

पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच दिवस शहरात अवकाळी पावसाची शक्यता आहे.11 व 12 मे रोजी शहरासह जिल्ह्याला ऑरेंज, तर 13 ते 15 मे पर्यंत यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.13 रोजी शहरात मतदान आहे, त्या दिवशीदेखील शहरासह जिल्ह्याला हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.
शहराभोवती दुपारी तीनपासून काळ्याभोर ढगांची गर्दी झाली. संपूर्ण जिल्ह्याला गरजणार्‍या आणि बरसणार्‍या ढगांनी वेढले, त्यामुळे शहरात दुपारी तासभर अवकाळी पावसाने झोडपून काढले. अनेक भागांत विजांच्या कडकडाट जोरदार होता. शिवाजीनगर भागात 0.5 मि.मी. पावसाची नोंद झाली.
-अनुपम कश्यपि, निवृत्त हवामान विभागप्रमुख, पुणे

फांद्या पडल्याने वाहतूक विस्कळीत

शहर परिसरात शुक्रवारी दुपारी तीननंतर मुसळधार पाऊस सुरू झाला. पावसामुळे कोंढव्यातील शीतल पेट्रोल पंप, धायरी, भवानी पेठ, एरंडवणे अग्निशामक केंद्राच्या परिसरात, येरवड्यातील सादलबाबा चौक, लोहियानगर, कोथरूडमधील गिरिजा शंकर सोसायटी, स्वारगेट परिसरातील वेगा सेंटर, स्वारगेट पोलिस वसाहतीत झाडे पडली. येरवड्यात झाड पडल्याने एका मोटारीचे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने मदतकार्य सुरू केले. रस्त्यात पडलेल्या झाडांच्या फांद्या हटवून रस्ते वाहतुकीस मोकळे करून देण्यात आले. दुपारी पाऊस सुरू झाल्यानंतर तासाभरात दहा ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली.

शहरात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित

शहर परिसरात शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. दरम्यान टप्प्या-टप्प्याने शहरातील वीजपुरवठा सुरळीत झाला. सुमारे तीन ते पाच तास वीजपुरवठा खंडित होता.
अवकाळी पावसाने एक तासातच शहरात दाणादाण उडवली. यामुळे झाडे, झाडांच्या फांद्या वीज वाहिन्यांवर पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. शहरातील वानवडी, मुंढवा, केशवनगर, धानोरी, लोहगाव, विमाननगर, गोखलेनगर  या भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता.

रस्त्यांना पूर, वाहनांवर पडली झाडे

शहरात शुक्रवारी दुपारी अचानक सुरू झालेल्या पावसाने नागरिकांची दाणादाण उडाली. सोसाट्याच्या वार्‍याने झाडांच्या फांद्या, पालापाचोळा रस्त्यावर उडून आला. तसेच छोट्या छोट्या टपर्‍यांमधील साहित्य वार्‍यामुळे दूरवर फेकले गेले. दुपारी
3:20 वाजता पावसाला सुरुवात झाली. सुरुवातील विजांचा जोरदार कडकडाट झाला तसेच वादळी वार्‍यामुळे रस्त्यावरची वाहतूक काहीकाळ मंदावली. पावसाचा जोरदार सपाटा सुरू झाल्याने वाहनधारकांनी मिळेल तेथे अडोशाला जागा धरली. सुमारे तासभर पावसाने शहराला झोडपले. शहरातील सर्व पेठांसह उपनगरात वादळी वार्‍यासह पावसाने दाणादाण उडवून दिली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news