Team India in Trouble : टीम इंडियाचे वनडेतील अव्वल स्थान धोक्यात, कारण… | पुढारी

Team India in Trouble : टीम इंडियाचे वनडेतील अव्वल स्थान धोक्यात, कारण...

पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India in Trouble : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना बुधवारी (22 मार्च) चेन्नई येथे होणार आहे. एमए चिदंबरम स्टेडियमवर टीम इंडिया सहा वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. हा निर्णायक सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघांनी जय्यत तयारी केली आहे. भारताला मायदेशात सलग आठवी मालिका जिंकण्याची संधी आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया चेन्नईच्या मैदानावर शेवटच्या वेळी 2017 मध्ये आमनेसामने आले होते. त्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 26 धावांनी विजय मिळवला होता.

टीम इंडियाचे अव्वल स्थान धोक्यात (Team India in Trouble)

मुंबईत भारताने मालिकेतील पहिला सामना पाच गडी राखून जिंकला. त्यानंतर विशाखापट्टणम येथील दुस-या वनडेत ऑस्ट्रेलियाने जबरदस्त कमबॅक केले. त्या सामन्यात कांगारूंच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजीला लोटांगण घालण्यास भाग पाडले आणि संपूर्ण संघ 117 धावांत ऑलआऊट केला. त्यानंतर विजयासाठीचे 118 धावांचे लक्ष्य 10 विकेट्स आणि 234 चेंडू राखून आरामात गाठले. पाहुण्या संघाच्या या दणदणीत विजयानंतर उभय देशांतील मालिका 1-1 बरोबरीत आली. आता तिसरा सामना एक प्रकारे फायनलच असेल.

टीम इंडियाला 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2-3 असा पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर भारतीय संघाने मायदेशात आतापर्यंत सलग सात मालिका जिंकल्या आहेत. या दरम्यान द. आफ्रिकेविरुद्धची एक मालिका कोरोनामुळे पूर्ण होऊ शकलेली नाही.

सध्या टीम इंडिया हा वनडेमध्ये पहिल्या क्रमांकाचा संघ आहे. पण, चेन्नईत संघाला पराभव पत्करावा लागला तर त्यांची नंबर 1 ची खुर्ची हिसकावून घेतली जाईल. ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोघांचे 113-113 रेटिंग गुण होतील. यात कांगारू टीम इंडियाच्या पुढे असेल. अशा परिस्थितीत टीम इंडियाला मालिका जिंकण्यासाठी फक्त हा सामना जिंकावा लागणार नाही तर वनडेमध्येही टीम इंडियाला आपले अव्वल स्थान वाचवायचे आहे. त्यामुळे तिसर्‍या सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवून मालिका विजयासोबतच वनडे क्रमवारीत पहिल्या स्थानी कायम राहण्याचा रोहित शर्माचा सर्वोत्तम प्रयत्न असेल.

तर ऑस्ट्रेलियाची चौथ्या स्थानी घसरण होईल

चेन्नईमध्ये विजय मिळवताच टीम इंडियाचे रेटिंग 115 होईल. यासह, हा संघ पहिल्या क्रमांकावर कायम राहील. पण ऑस्ट्रेलियन संघाची 2 स्थानांनी घसरण होईल आणि ते चौथ्या स्थानावर पोहोचतील. याचा फायदा न्यूझीलंड आणि इंग्लंडला होऊन हे दोन्ही संघ अनुक्रमे दुस-या, तिसऱ्या क्रमांकावर येतील.

तिसऱ्या वनडेत सूर्या की इशान?

टी-20 मध्‍ये नंबर 1 फलंदाज असलेला सूर्यकुमार यादव वनडेमध्‍ये सतत फ्लॉप ठरत आहे. त्याला संधी मिळते, पण त्याचा फायदा उठवता येत नाही. सूर्याने आतापर्यंत 22 एकदिवसीय सामन्यांच्या 20 डावांमध्ये 25.47 च्या सरासरीने केवळ 433 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने केवळ दोन अर्धशतके झळकावली आहेत. गेल्या 14 डावांमध्ये सूर्याच्या बॅटमधून एकही अर्धशतक झळकले नाही. या कालावधीत सूर्याला केवळ पाच वेळा दुहेरी आकडा गाठता आला. यावरून त्याचा वनडेतील खराब फॉर्मचा अंदाज लावता येतो. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या गेल्या दोन सामन्यांत तर सूर्या खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. अशा स्थितीत तिसऱ्या वनडेत त्याला प्लेइंग 11 मधून वगळले जाऊ शकते आणि त्याच्या जागी इशान किशनला संधी मिळू शकते, असे काहींनी म्हटले आहे.

चेन्नईत भारताचा रेकॉर्ड कसे आहे?

भारताने 9 ऑक्टोबर 1987 रोजी एमए चिदंबरम स्टेडियमवर पहिला एकदिवसीय सामना खेळला. या सामन्यात टीम इंडियाचा एका धावेने पराभव झाला होता. आतापर्यंत भारताने चेन्नईमध्ये 13 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या काळात त्यांना सात सामने जिंकण्यात यश आले आहे. पाचमध्ये पराभव तर एका सामन्याचा निकाल लागला नाही. 2019 मध्ये जेव्हा भारतीय संघ येथे शेवटचा खेळला तेव्हा वेस्ट इंडिजने यजमान संघाचा आठ गडी राखून पराभव केला होता. (Team India in Trouble)

एमए चिदंबरम स्टेडियममधील आकडेवारी

या मैदानावर टॉस खूप महत्त्वाचा ठरणार आहे. या मैदानावर टॉस जिंकणाऱ्या संघांनी 15 सामने जिंकले आहेत. त्याचवेळी टॉस गमावणा-या संघाने केवळ सहा विजय मिळवले आहेत. येथे सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम एसीसी एशियन इलेव्हनच्या नावावर आहे, ज्यांनी 2007 मध्ये आफ्रिका इलेव्हनविरुद्ध 7 बाद 337 धावा केल्या होत्या. तर सर्वात कमी धावसंख्या केनियाची आहे. 2011 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध हा आफ्रिकन संघ 69 धावांमध्ये ऑलआऊट झाला होता. या मैदानावर वैयक्तिक सर्वोच्च धावा करण्याचा विक्रम पाकिस्तानच्या सईद अन्वरच्या नावावर आहे. अन्वरने 1997 मध्ये भारताविरुद्ध 194 धावा केल्या होत्या.

चेन्नईच्या मैदानावर भारतीय गोलंदाजांना मदत मिळू शकते. इथली खेळपट्टी फिरकीपटूंना अनुकूल आहे. त्यामुळे भारतीय संघ त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोनहून अधिक फिरकीपटूंचा समावेश करू शकतो. यापूर्वी या मैदानावर वेगवान गोलंदाजांची चलती असायची, परंतु आता खेळपट्टीत बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे चेन्नईच्या या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियन फलंदाजांना नक्कीच अडचणींचा सामना करावा लागेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेवटच्या सामन्यातकडे जगभरातील चाहत्यांना सर्वोत्तम खेळ पाहायला मिळणार हे नक्की.

Back to top button